लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूसाठा नष्ट

31
  •  स्थानिक गुन्हे शाखा व भद्रावती पोलिसांची संयुक्त कारवाई

चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याकरिता चंद्रपूर पोलिस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी तसेच अवैध दारू निर्मिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले असून या पथकाने 17 मार्च रोजी मोठ्या प्रमाणात हातभट्टी व दारू साठा नष्ट केला.

.      भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत बरांज तांडा येथे एक इसम हातभट्टी लावून अवैधरित्या दारू काढत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच भद्रावती पोलिस स्टेशन येथील पथक बरांज तांडा येथे पोहचले. यावेळी शोध घेतला असता एक महिला तिच्या घराच्यामागे हातभट्टी लावून गुळ मिश्रित दारू गळताना आढळली. सदर घराची कायदेशीररित्या झडती घेतली असता घरामध्ये गुळ, दारू व तीन प्लास्टिक कॅन मध्ये 15 लिटर शरीरास अपायकारक व नाशकारक द्रव्यमिश्रित पदार्थापासून तयार केलेली हातभट्टी गुळांबा दारू आढळून आली. तसेच घराच्या समोर झुडपी जंगलात व नाल्यात जमिनीत गाडलेल्या खड्ड्यांमध्ये बारा प्लास्टिक ड्रम मध्ये दारू सडवा किंमत 90 हजार रुपये तसेच मोठे स्टीलचे गुंड व इतर साहित्य असे एकूण 97 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या संदर्भात आरोपी सुनीता राजेंद्र पाटील (35) हिच्याविरुद्ध भद्रावती पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

.      सदर कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन तसेच अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, भद्रावतीचे पोलिस निरीक्षक विपिन इंगळे यांच्या नेतृत्वात हर्षल एकरे, मनोज गदादे, विनोद भूरले, धनराज करकाडे, स्वामीनाथ चालेकर, संजय आतकुलवार, सुरेंद्र मोहतो, गजानन नागरे, अनुप डांगे व इतर अधिकारी व कर्मचा-यांनी पार पाडली.