वरोरा : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात वरोरा तालुक्यातील हिरालाल लोया विद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 1जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले.
. विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेविषयी उत्तरदायित्वाची भावना निर्माण होणे, विद्यार्थ्यांना शिकतांना प्रेरणादायी वातावरणाची निर्मिती व्हावी या साठी हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात महाराष्ट्रातील अनेक शाळांनी सहभाग घेतला. वरोरा तालुक्यातील खासगी व्यवस्थापनाच्या 41शाळांनी यात सहभाग घेतला होता. त्यात वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालयाने प्रथम क्रमांक, नागरी येथील नूतन नेहरू विद्यालयाने द्वितीय क्रमांक आणि आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथील शाळेने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विविध निकषांवर आधारित शाळांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठांकडून मूल्यमापन करण्यात आले.
. शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य रविकांत जोशी, सर्व अध्यापक – अध्यापिका तथा कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नीरजबाबू गोठी व सचिव कृष्णकांत लोया यांनी केले आहे. मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन शाळेला नवी दिशा देण्याचे कार्य केले. मुख्याध्यापक रविकांत जोशी यांनी शाळेच्या सर्व सहकारी अध्यापक तथा संपूर्ण चमूचे अभिनंदन केले त्यामुळे सर्वत्र शाळेचे कौतुक होत आहे.


