सुरजागड खनिज वाहतूक जीवघेणी
अपघाताची शृंखला संपता संपेना
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
कोठारी : सुरजागड येथून लोहखनिज भरून बल्लारपूरकडे जाणार्या हायवा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून नाल्यात कोसळला. सदर घटना कोठारी येथे गुरुवारी दि. १५ फेब्रुवारीच्या पहाटे घडली असून चालक गंभीर जखमी झाला आहे. सुरजागड येथील वाहतूक जीवघेणी ठरत असून या मार्गावर अपघाताची शृंखला संपता संपेना याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज उत्खनन करून आल्लापल्ली ते बल्लारपूर या राष्ट्रीय महामार्गावरून शेकडो जड वाहने सुसाट दिवसरात्र धावत असतात. या मार्गावरील अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून अनेकांचे जीव गेले आहेत. सतत चोवीस तास जड वाहतूक सुरू असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून रस्त्यावरील गावांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असंल्याने नागरिकांत संताप उमटत आहे. ४ फेब्रुवारीला कोठारी जवळ सुरजागड हायवाने दोन दुचाकी स्वारांना धडक देत तिघांचा जीव घेतला होता. ही घटना ताजी असतानाच आज पहाटे ३ वाजताच्या दरम्यान लोहखनिज भरलेला हायवा कोठारी पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळला. त्यात जीवित हानी झाली नसली तरी वीस फूट नाल्यात कोसळलेल्या चालकास गंभीर दुखापत झाली. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला मात्र हायवाचे मोठे नुकसान झाले आहे.
महामार्गाची दुर्दशा लोहखनिज भरून सतत धावणाऱ्या जड वाहनाने बल्लारपूर-आल्लापल्ली महामार्गाची वाट लागली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याचे दोन्ही बाजूच्या साईडिंग पूर्णपणे उखळून त्याचे लांबच लांब खड्यात रूपांतर झाले असून अपघातास आमंत्रण देत आहेत. वाहन सुरक्षेसाठी वळणाचे ठिकाणी सुरक्षा कठडे तयार करण्यात आले असून सततच्या अपघाताच्या मालिकेने सुरक्षा कठडे उध्वस्त झाले आहेत. गावागावातील रस्ता दुभाजक जागोजागी तुटलेले आहेत. महामार्गावरील पुलांची अवस्था गंभीर बनली असून अनेक पुलावरील सुरक्षा कठडे तुटलेले असून अपघातास निमंत्रण देत आहेत. या मार्गावर रस्त्याची गंभीर समस्या उद्भवली आहे.
बांधकाम कंपनी हैराण तीन वर्षांपूर्वी बामणी ते विहिरगाव या महामार्गाचे बांधकाम बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून करण्यात आले. सध्या कंपनी रस्त्याची देखभाल करीत आहे.रस्त्याची दररोजची डागडुजी करून हैराण झाली आहे. या मार्गावर अपघात दैनंदिन होत असून रस्त्याची, पुलांची व सुरक्षा कठड्याचे तीनतेरा वाजले आहेत. रस्ता दुरुस्ती करून कंपनी परेशान झाली आहे. महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंते, अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. प्रशासन ढिम्म झाले आहे.
महामार्गाची जीवघेणी वारी बल्लारपूर-आल्लापल्ली राष्ट्रीय महामार्गावरून लोहखनिज वाहतूक नियमित सुरू असल्याने व चालक मद्य प्राशन करून वाहने सुसाट चालवीत असतात. वाहनवरील नियंत्रण सुटल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याने हा महामार्ग जीवघेणा ठरत आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून ये-जा करणे म्हणजे अपघाताची वारी होण्याची भीती संचारली आहे. या वाहनावर आळा कोण घालणार व अपघातावर कधी नियंत्रण येणार असा सवाल गावकरी करीत आहेत.