गहू, हरभरा, ज्वारी चे नुकसान
अनेक पक्षांचा मृत्यू
चंद्रपुर : रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटाने चंद्रपुर जिल्ह्यात चांगलीच दाणादाण उडविली. शेतात असलेला हरभरा, गहू, ज्वारी सह इतर पिकांचे फार मोठे नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली तर या गारपिट मुळे अनेक पक्षांचा मृत्यू झाल्याचेही उघडकीस आले.
. जिह्यात रविवारी सकाळ पासूनच वातावरणात बदल जाणवत होता. पाऊस किंवा गारपीट होईल असा अंदाज नसताना अचानक सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वरोरा, भद्रावती, चिमूर तालुक्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारपीट चा सडा पडू लागला. चंद्रपूर नागपूर महामार्गांवर अनेक वाहनधारकांनी वाहने रोडवरच थांबाविल्याने रात्री वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तर वादळात अनेकांच्या घरांवरील पत्र्याचे छत उडाले. झाडे उन्मळून पडले. त्यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक गावे अंधारात बुडाली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. वरोरा भद्रावती तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने दाणादाण केली. हातात आलेला हरभरा पाण्याने भुईसपाट झाला. गहू, ज्वारी चे अतोनात नुकसान झाले. तर पाणवडाळा येथे धनराज आसेकर यांच्या शेतातील हरभरा, गहू, ज्वारी पिकाचे नुकसान झाले. सोबतच त्यांच्या शेतात कित्येक पक्षांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. अवकाळी पाऊस व गारपीट ने झालेल्या नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.