ग्रामीण रस्त्यांची झाली चाळणी
महेंद्र कोवले
सिंदेवाही : मागील पाच वर्षापासून सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य समस्या म्हणजे सिंदेवाही शहराला जोडणारे रस्ते. या ग्रामीण भागातील रस्त्यांची पूर्णतः चाळणी झाली असून तालुका विकासापासून कोसो दूर जात आहे. त्यामुळें ग्रामीण भागातील रस्ते व सिंदेवाही तालुक्याच्या विकासाला मुहूर्त कधी मिळणार ? असा प्रश्न जागरूक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
. ग्रामीण भाग हा शहराला जोडण्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करीत रस्त्यांची निर्मिती करून प्रत्येक गाव शहरी भागासोबत जोडलेला आहे. सध्या ग्रामीण भाग जाणारे सर्व रस्ते उखळले असून ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने रस्ता असून नसल्या सारखा दिसत आहे. सिंदेवाही ते गडबोरी वासेरा, या रस्त्याची पूर्णतः वाट लागलेली आहे. सिंदेवाही ते मुरमाडी – कोठा – कळमगाव हा रस्ता पूर्णतः खराब झालेला आहे. तसेच नवरगाव – रत्नापूर – शिवणी हा आठ किलोमीटरचा रस्ता पूर्णतः उखळलेला आहे. नवरगाव ते नैनपुर या रस्त्याची चाळणी झालेली आहे. सिंदेवाही ते गूंजेवाही , पळसगाव (जाट) ते देलनवाडी – नवरगाव, या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अनेकदा अपघात झालेले आहेत. सिंदेवाही ते टेकरी – वाकल, हा रस्ता सुद्धा पूर्णतः उखललेला आहे. असे असताना या भागातील लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागातील रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.
. सिंदेवाही तालुका हा विकासापासून वंचित राहिलेला असून खऱ्या अर्थाने या तालुक्यावर लोकप्रतिनिधींचे लक्षच गेले नाही. राज्यात व देशात भाजपा महायुतीची सत्ता आहे. या तालुक्याला खासदार भाजपचा तर आमदार काँग्रेस पक्षाचा मिळालेला आहे. या तालुक्याच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याच्या केवळ बातम्या सोशल मीडियावर झळकल्या आहेत. मात्र तालुक्यातील रस्ते आणि विकासात्मक कामे करण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार ? येथील जनतेला विकासासाठी किती दिवस वाट पाहावी लागणार ? ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांचे जीव गेले. तर कोणाला कायमचे अपंगत्व आले आहे.
. मात्र येथील निर्दयी लोकप्रतिनिधींना अजूनही जाग का येत नाही ? येथील नागरिकांचा किती अंत पाहणार आहेत? मोठमोठ्या विचारमंचावर भाषण देणे म्हणजे विकास होत असेल , तर यापुढे नागरिकांनी कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून विकासकामांची अपेक्षा करू नये. या भागाचे लोकप्रतिनिधी सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागात कधीच गेले नाहीत काय? किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था दिसत नाही का? असा संताप व्यक्त करीत येथील नागरिक येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला माफ करणार नाही. ही वास्तविकता नाकारता येत नाही. त्यामुळे सजग असलेल्या लोकप्रतिनिधींनी सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्याचा व विकासकामांचा मुहूर्त त्वरित काढावा . अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.