वरोरा : बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे राष्ट्रीयस्तरावर दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी मदुराई येथील आर. सुंदरसेन यांना, तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मध्यप्रदेशातील राजकुमार सिन्हा यांना देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव डॉ. अशोक बेलखोडे यांनी आनंदवन येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
. आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात बाबा आमटे यांच्या ९ फेब्रुवारीला असलेल्या स्मृती दिनाचे औचित्य साधत शनिवार, १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एकता अभियान समितीच्या वतीने होणाऱ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
. महारोगी सेवा समितीचे कार्यकारी विश्वस्त तसेच एकता अभियान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात कोलकाता येथील सामाजिक कार्यकर्ते व भारत जोडो अभियानाचे पूर्वांचल विभागाचे राष्ट्रीय समन्वयक ओ. पी. शहा यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. यावेळी नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले नागपूरचे मेंदू विकार तज्ज्ञ व जागतिक मेंदू विकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती राहील. १ लाख रुपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ५१ हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असा आहे.
. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. पत्रपरिषदेला डॉ. विकास आमटे, ट्रस्टचे सचिव डॉ. अशोक बेलखोडे, ट्रस्टचे सदस्य शकील पटेल, गिरीश पद्मावार उपस्थित होते.


