प्रवीण गावंडे आणि हेमंत तेलंग नायब तहसिलदार म्हणून झाले रुजू
सिंदेवाही – मागील अनेक महिन्यांपासून सिंदेवाही तहसिल कार्यालय केवळ एका नायब तहसिलदार यांच्या भरवशावर सुरू असताना अखेर बऱ्याच दिवसांनंतर सिंदेवाही तहसील कार्यालयाला दोन नायब तहसीलदार मिळाले असून गुरुवारी प्रवीण गावंडे आणि हेमंत तेलंग यांनी नायब तहसीलदार यांची सूत्रे हाती घेतली आहे.
. गेल्या काही महिन्यापासून सिंदेवाही तहसील कार्यालयात एकच परिविक्षाधीन नायब तहसिलदार मंगेश तुमराम हे नायब तहसीलदार संजय गांधी योजना, निवासी नायब तहसीलदार, नायब तहसिलदार नियमित तसेच नायब तहसिलदार निवडणूक म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्यामुळे अनेक कामे रेंगाळली जात असून नागरिकांची कामे वेळेवर केल्या जात नव्हती. ग्रामीण भागातून कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना नायब तहसिलदार न मिळाल्यामुळे आल्या पावली परत जावे लागत होते.
. पर्यायाने त्या कामाला पंधरा ते वीस दिवस लागायचे. मात्र अनेक दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर नुकतेच सिंदेवाही तहसिल कार्यालय मध्ये प्रवीण गावंडे व हेमंत तेलंग यांचे रूपाने दोन नायब तहसीलदार मिळाले असल्याने आता नागरिकांचे काम सुलभ होणार आहे. नुकत्याच रुजू झालेल्या नायब तहसिलदार यांचेकडे नायब तहसीलदार नियमित आणि नायब तहसीलदार निवडणूक म्हणून पदभार सोपविण्यात आला आहे. तहसील कार्यालय सिंदेवाही येथे दोन नायब तहसिलदार रुजू झाले असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


