डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे प्रतिपादन
विसापुरात रंगला चिमुकल्यांनाचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव
विसापूर : आजचे युग स्पर्धेचे आहे. शिक्षण क्षेत्रात ही स्पर्धा मोठी आहे. यावर मात करून गुरुकुल इंग्लिश स्कूल विद्या ज्ञानाचे कार्य करत आहे. बालमनावर उत्कृष्ट संस्कार करत आहे. यामुळेच येथील विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेत प्रतिभा सिद्ध करत आहे. यातून गावाचे नावलौकिक होत आहे. गुरुकुलने बालमनावर संस्कार करणारे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या व बाल रोग तज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी विसापूर येथे केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी चौक येथे वार्षिक सांस्कृतिक महोत्सव थाटात गुरुवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य माधुरी अंडेलवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अभिलाषा गावतुरे, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रा.पं. सदस्य विद्या देवळाकर, दिलदार जयकर, सामाजिक कार्यकर्ता संदीप पोडे, अनिल कहाळे, चंद्रकांत पावडे, उद्धव गिरसावळे यांची उपस्तिथी होती.
. दरम्यान गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर करून सांस्कृतिक संमेलनाच्या महोत्सवाला प्रारंभ केला. त्या नंतर विविध नृत्य प्रकारचे उत्कृष्ट सादरीकरण करून पालकांना व प्रेक्षकांना रिझविले. एकापेक्षा एक सरस नृत्यांच्या सादरीकरणाने सारेच भारावले. तत्पूर्वी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक प्रदान करून गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे पालकांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाळेतील माजी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. या वार्षिक महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन प्राचार्य माधुरी अंडेलवार यांच्या मार्गदर्शनात रीना चिकाटे, किरण वैद्य, समीक्षा खैरकर, सोनल पुणेकर, अमृता तामगाडगे, संध्या बोबडे, टीना बर्नाड आदीने केले.


