शासनाच्या वतीने कुष्ठरोग निवारण पंधरवाडा साजरा होणार
वरोरा : राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी आणि जागतिक कुष्ठरोग निवारण दिनाचे सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करणारा एक छोटा समारंभ आनंदवनात 30 जानेवारी रोज मंगळवारला घेण्यात आला. यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने 30 जानेवारी ते 13 फरवरी यादरम्यान कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात आनंदवनचे सर्वेसर्वा डॉक्टर विकास आमटे, तालुका कुष्ठरोग अधिकारी राजेश वाटेकर, डॉक्टर कृष्णा कुलधर, डॉक्टर ऋषिकेश गावंडे, डॉक्टर राधिका किन्नाके,आनंदवनाच्या सरपंचा रूपाली वाळके हे मान्यवर उपस्थित होते.
. तालुका कुष्ठरोग अधिकारी राजेश वाटेकर यांनी उपस्थितांना कुष्ठ रुग्णांना आपलेसे करण्याबाबत व त्यांच्याशी आत्मीय सलोखा बाळगण्याबाबत शपथ दिल्यानंतर सिताराम लेप्रसी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पोळ यांनी कुष्ठरोग आणि कुष्ठरुग्णांबाबत जनमानसात असलेले अज्ञान, अंधश्रद्धा व गैरसमज यांचे निराकरण केले. कुष्ठरोग हा सर्वसामान्य रोग असून बहुविध औषधोपचारामुळे शंभर टक्के बरा होतो. कोणत्याही अन्य व्याधीबाबत अशी हमी दिली जात नाही. तो अनुवंशिक नसून या रोगासाठी पथ्यपाण्याचे कोणतेही बंधन नाही असे मत यावेळी व्यक्त केले. कुष्ठरोगाचे जंतू मज्जा संस्था निकामी करत असल्याने कुष्ठरुग्णांनी डोळे,हात पाय याविषयी काळजी घ्यावी व भौतिकोपचारचा अवलंब करण्याविषयी डॉक्टर कृष्णा कुलधर यांनी विवेचन केले.
. आनंदवनातील कुष्ठ रुग्णांच्या स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतीसाठी कार्यान्वित असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती कपिल कदम यांनी उपस्थितांसमोर मांडली. डॉक्टर विजय पोळ आणि डॉक्टर कुलधर कृष्णा यांनी केलेल्या वक्तव्याला दृकश्राव्यची जोड मिळाल्यामुळे उपस्थितांना कुष्ठरोग आणि रुग्णांबाबतचे सखोल ज्ञान मिळाले. महारोगी सेवा समितीचे सचिव डॉक्टर विकास आमटे यांनीही याप्रसंगी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
. कुष्ठरोग निवारणाबाबत शासनाच्या वतीने 30 जानेवारी ते 13 फरवरी पर्यंत राबविण्यात येणाऱ्या पंधरवड्यात होणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती तालुका कुष्ठ अधिकारी राजेश वाटेकर व सुरेश वाटते यांनी उपस्थितांना देत शासनाच्या या प्रयासांना जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला आनंदवनातील जेष्ठ कार्यकर्ते माधव कवीश्वर यांचे सह आनंद निकेतन महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर संयोगिता वर्मा व 30 विद्यार्थी विद्यार्थिनी व अनेक मान्यवर उपस्थित होते.