अंगणवाडीतील चिमुकल्यांचा किलबिलाट अजूनही बंद

62

४ डिसेंबर पासून सेविका, मदतनीस यांचे कामबंद आंदोलन सुरूच

सिंदेवाहीतील १७७ अंगणवाडी केंद्र कुलूप बंद अवस्थेत

✒️महेंद्र कोवले

    सिंदेवाही

.             अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्यांच्या मागण्यासाठी पुकारलेला कामबंद संप २४ दिवस उलटल्यानंतरही अजूनही सुरूच असल्याने सिंदेवाही तालुक्यातील सर्वच अंगणवाडीतील चिमुकल्यांचा किलबिलाट बंद होऊन पोषण आहारविना बालकांसह गरोदर मातांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम दिसू लागल्याने शासनाने यावर त्वरित तोडगा काढावा. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

.             ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, तसेच गरोदर, व स्तनदा माता यांच्या आरोग्य, आहार, कुपोषण यासारख्या अन्य बाबीकडे लक्ष देणे, अशा कामांचा समावेश करून शासनाने ग्रामीण भागामध्ये एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी केंद्रे सुरू केली. ही अंगणवाडी केंद्रे सेविका चालवतात. तर मदतनीस यांना मदत करतात. सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागात १४८ अंगणवाडी केंद्र, शहरी भागात १५ अंगणवाडी केंद्र, तर १४ मिनी अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. येथील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपल्या रास्त आणि महत्वाच्या मागण्यासाठी ४ डिसेंबर पासून कामबंद संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे मागील २४ दिवसापासून सर्व अंगणवाडी केंद्र कुलूप बंद अवस्थेत आहेत. अंगणवाडी केंद्र कुलूप बंद असल्याने बालकांना मिळणारा पोषण आहार, तसेच गरोदर ,आणि स्तनदामाता यांना मिळणारा आहार बंद झालेला आहे. त्यामुळे बालकांसह मातांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसू लागला आहे.

.             अंगणवाडी सेविका तथा मदतनीस यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नुकतेच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नसल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपले कामबंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण १७७ अंगणवाडी केंद्र कुलूप बंद अवस्थेत असल्याने चिमुकल्यांचा किलबिलाट बंद झालेला आहे. तसेच गरोदर आणि स्तनदा माता यांच्या पोषण आहाराला सुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संपाचा फटका बसलेला आहे. त्यामुळें शासनाने एकतर संपावर तोडगा काढावा, किंवा पोषण आहाराची व्यवस्था करावी. अशी मागणी आता सर्वच स्तरावरून जोर धरू लागली आहे.