स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही बहुरूपी समाज उपेक्षितच

75

“बहुरूपी” समाजाला प्रवाहात आणण्याची गरज

महेंद्र कोवले
 सिंदेवाही 

.         विविध प्रकारची वेशभूषा करीत नागरिकांचे मनोरंजन करणारा बहुरूपी समाजातील लोक पिढ्यानपिढ्या वेगवेगळ्या प्रकारची सोंग घेऊन आजही आपली परंपरा कायम ठेवत आहे. , आपले दुःख लपवून कायम दुसऱ्यांना हसवत जीवन जगणारा हा समाज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर ही उपेक्षित जीवन जगत असून शासन स्तरावरून नियमानुसार मिळणारे मानधन, तसेच विविध योजनांचे लाभ देऊन या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची खरी गरज आहे.

.         सध्याच्या आधुनिक युगात बहुरूपी समाजाची कला लोप पावत चाललेली आहे. तर दुसरीकडे ही कला जोपासत नागभीड तालुक्यातील वैजापूर येथील बहुरूपी कलाकार ताराचंद तंदुळकर हे बहुरूप्यांची कला जिवंत ठेवत आपली उपजीविका भागवत आहेत. बहुरूपी हा अत्यंत गरीब समाज असून समाजातील जास्तीत जास्त लोक हे निरक्षर आहेत. त्यांना कायद्याचे काहीही ज्ञान नाही. वेगवेगळ्या प्रकारचे सोंग घेऊन, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेश धारण करून गावोगावी फिरून पैसे आणि धान्य गोळा करून आपली उपजीविका करणे हे यांचे एकमेव साधन आहे.

.         कधी पांगुळ, कधी सूरी वाले, कधी हनुमान , तर कधी पोलीस हवालदार बनून पिढ्यानपिढ्या पासून अविरतपणे लोकांचे मनोरंजन करून हा समाज आपले जीवन जगत आला आहे. वर्षभर गावोगावी फिरणे, त्यामुळे या समाजाचा शिक्षणाशी काहीही संबंध आलेला नाही. परिणामी आजही अन्य सुविधा पासून हा समाज वंचित राहिलेला राहून विकासापासून कोसो दूर गेलेला आहे. अलिकडच्या काळात शिक्षणाच्या प्रवाहामुळे नवीन पिढीतील लोक वेगवेगळ्या व्यवसायात पुढे येत आहेत. त्यामुळे नवीन पिढी आपले पारंपरिक सोंग घेण्याच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून शिक्षणाकडे वळलेला आहे. त्यातच कुणी गावागावात जावून चादर, बांगड्या, बेडशीट, खुर्च्या, प्लास्टिक कटोरे, इत्यादी साहित्य विकण्याचा व्यवसाय करीत असल्याचे ताराचंद तंदुळकर यांनी दैनिक नवजीवन ला सांगितले.

.         तसेच या समाजातील महिला वर्ग शेतीची कामे करून कुटुंबाच्या उदरनिर्वाह साठी मदत करीत आहेत. वेगवेगळी सोंग काढून लोकांना हसविनाऱ्या बहुरूपी कलाकारांना किंवा बहुरूपी समाजाला शासनाने मानधनाची सुविधा उपलब्ध करून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. मागील काळात बहुरूपी कलेला वाव होता. या आधुनिक युगातही आपली कला जिवंत ठेवत विविध रूपं धारण करून वैजापूर ( कोजबी ) येथील ताराचंद तंदुळकर हे महाराष्ट्रभर फिरून आपली कला सादर करून कलेतून मिळणाऱ्या पैशातून आपली उपजीविका करीत आहेत. त्यामुळे शासन स्तरावरून मिळणारे वृद्ध कलाकारांचे मानधन, तसेच विविध प्रकारचे शासनाकडून मिळणारे लाभ या समाजाला देऊन यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे.