Home विदर्भ गौरी शारदा मंडळाच्या महिलांनी गाव स्वच्छतेचा घेतला वसा

गौरी शारदा मंडळाच्या महिलांनी गाव स्वच्छतेचा घेतला वसा

924

आठवड्यातून एकदा गावातील प्रमुख मार्गाची केली जात आहे स्वच्छता.

सिंदेवाही

.             आपले गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र मी आणि माझे कुटुंब यामध्ये सीमित असलेल्या नागरिकांना गावच्या स्वच्छतेचे काहीच सोयर सुतक नसल्याचे दिसून येत असतानाच सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील गौरी शारदा महिला मंडळाच्या वतीने गाव स्वच्छ करण्याचा वसा घेतला असल्याचे गावातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

.             सिंदेवाही तालुक्यातील वासेरा या गावात जवळपास साडे चार हजार लोकसंख्या राहत असून सर्व सोयी सुविधा असल्याने परिसरातील अनेक गावातील नागरिक वासेरा येथे ये जा करीत असतात.. गावच्या दर्शनी भागात आकर्षक असे प्रवेशद्वार असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुतळे बसविण्यात आले आहे. यामुळे गावात येणारे नागरिक गावाची प्रशंसा करीत प्रवेशद्वारातून गावात प्रवेश करतात. मात्र गावातील रस्ते अस्वच्छ, नाल्या अस्वच्छ दिसतील यामुळे गावातील गौरी शारदा महिला मंडळाच्या वतीने आठवड्यातून एक दिवस गावातील प्रत्येक चौक स्वच्छ करून गावातील नागरिकांना आपणही या स्वच्छतेच्या मोहिमेला साथ द्यावी. असा संदेश या माध्यमांतून देत आहेत. सध्या गावात ग्राम पंचायत तथा तंटामुक्त समितीचे वतीने हागणदारी मुक्तीसाठी पहाटेपासून कडक पहारा देणे सुरू असल्याने गावातील नागरिक शौचालयाचा नियमित वापर करणे सुरू केले असून गौरी शारदा महिला मंडळाच्या वतीने गावातील प्रमुख मार्ग स्वच्छ करण्याच्या या मोहिमेने वासेरा गाव नेहमी स्वच्छ आणि सुंदर दिसणार आहे.

.             यापूर्वी वासेरा गावात घाणीचे खूपच साम्राज्य असायचे. मात्र मागील दोन वर्षापासून गावाचा चेहरा मोहरा बदलून गेला असल्याने आता सिंदेवाही तालुक्यात सर्वात स्वच्छ आणि सुंदर गाव म्हणून परिचित झाले असल्याचे दिसून येत आहे.

.             गौरी शारदा महिला मंडळाच्या या सुंदर उपक्रमासाठी ग्राम पंचायत सरपंच महेश बोरकर आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू नंदनवार यांचे पुढाकारात आणि मार्गदर्शनात गौरी शारदा महिला मंडळाच्या असंख्य महिला आठवड्यातून एक दिवस सकाळी सहा वाजता गाव स्वच्छ करून या मोहिममध्ये गावकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. असा याद्वारे संदेश देत आहेत.

error: Content is protected !!