Home Breaking News पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात

पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात

822
  • एक ठार एक जखमी ; मूल जवळील घटना

चंद्रपूर – चंद्रपूर येथून छत्तीसगड राज्यातील बोहरमभेडी गावांत पार्थीव घेवून जाणा-या स्काॅर्पीओचा अपघात आज मंगळवार सकाळी 9 वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील जानाळा लगत असलेल्या नर्सरी जवळ घडली. या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर झाला. सदर अपघातग्रस्त स्काॅर्पीओ मध्यें चालकासह एकुण सहा जण प्रवास करीत होते.

चंद्रपूर लगतच्या पडोली लखमापूर परिसरातील कोल डेपो मध्ये काम करणारे केशवराम यादव (60) यांचे काल रात्री निधन झाले. छत्तीसगड मधील मानकापूर जिल्हयातील बोहरमभेडी येथील मूळ रहिवासी असल्याने मृतक केशवराम यादव याचे पार्थिव अंत्यसंस्काराकरीता त्याचे मूळ गावाला घेवून जाण्यासाठी त्याचे नातेवाईक छगनलाल साहु व इतर दोघेजण स्काॅर्पीओ (एचएच-34-बीएफ 0050) ने सकाळी 9.15 वाजताच्या दरम्यान लखमापूर येथून छत्तीसगडकडे रवाना झाले.

दरम्यान सकाळी 9.50 वा. चे दरम्यान मूल पासून चंद्रपूर मार्गावरील 7 कि.मी.अंतरावर असलेल्या जानाळा लगतच्या नर्सरी जवळ स्काॅर्पीओ चालक अश्वजीत रूपचंद सहारे (26) रा. दुर्गापूर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मार्गावरील पुलाच्या कठडयाला स्काॅर्पीओने धडक दिली.

अपघातग्रस्त वाहन भरधाव वेगात असल्याने वाहनाच्या धडकेने पुलाचा कठडा तुटून मार्गाच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिली. यामध्यें गोंदिया जिल्हयातील अर्जूनी मोरगांव तालुक्यातील बुटाई येथील रहीवासी असलेले सचिन मोहन साखरे (32) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतक सचिन साखरे हा स्काॅर्पीओ चालक अश्वजीत सहारे याचा नातेवाईक असून पार्थिव पोहोचवून परत येतांना सोबतीला एक जण असावा म्हणून स्काॅर्पीओ चालकाने त्याला सोबत घेतले होते. अपघातामध्ये छगनलाल साहु (60) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालय येथे हलविण्यात आले. इतर दोघांना किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप आहेत. घटनेची माहिती होताच मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील जखमी आणि मृतकाला हलविण्यात रूग्णवाहिकेला बोलाविण्यात आले परंतू रूग्णवाहीकेला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने शेवटी पोलीस वाहनामध्ये जखमी आणि मृतकांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुमीत परतेकी यांचे मार्गदर्शनात स्थानिक पोलीस कर्मचारी करीत आहेत.

error: Content is protected !!