चंद्रपुरातील अभ्यंकर शाळेजवळील जीवघेणा खड्डा अखेर बुजवायला सुरुवात !
अखेर मनपा प्रशासनाला घ्यावे लागले नमते
७ दिवसांत काम सुरू न झाल्यास खड्ड्यातच उपोषणाचा दिला होता इशारा
स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
चंद्रपूर : विठ्ठल मंदिर प्रभागातील अभ्यंकर शाळेजवळ पाण्याच्या टाकीसाठी खोदून ठेवलेला जीवघेणा खड्डा प्रशासनाने तात्काळ बुजवावा, अन्यथा खड्ड्यातच उपोषण करण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला होता. कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले आहे. आंदोलनाचा दणका मिळताच, मनपा प्रशासनाने आजपासूनच या महाकाय खड्ड्याचे काम करून तो बुजवायला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांमधून मोठा दिलासा व्यक्त होत आहे.
. विठ्ठल मंदिर प्रभागातील अभ्यंकर शाळा परिसरातील हा मुख्य मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. पाण्याच्या टाकीसाठी या ठिकाणी मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता, मात्र प्रदीर्घ काळापासून हे काम रखडल्याने नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. पावसाळा तोंडावर असल्याने या खड्ड्यात पाणी साचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात होती. मनपाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मनपा उपायुक्त टाले यांना निवेदन दिले होते व ७ दिवसांत काम सुरू न झाल्यास खड्ड्यात उभे राहून उपोषणाचा कडक इशारा दिला होता.
. काँग्रेसच्या या आंदोलनाचे गांभीर्य ओळखून आणि संभाव्य जनक्षोभ टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने तत्परता दाखवत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि लढ्याला मोठे यश आले आहे.
. “प्रशासनाने कामाला सुरुवात केली असली तरी हे काम दर्जेदार आणि लवकरात लवकर पूर्ण व्हावे, जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याकडे आमचे बारीक लक्ष राहील,” अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिली.
. हा खड्डा बुजवण्यासाठी काँग्रेस नेते बलवीर सिंग, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, राधा पुलगमकर, प्रफुल पुलगमकर, अतुल पिंपळकर, मनिष दास, गुंजन येरमे, अतुल ठाकरे आणि विठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिकांनी प्रशासनावर दबाव निर्माण केला होता.


