Home सामाजिक चंद्रपुरात ‘संडे ऑन सायकल रॅली’ उत्साहात संपन्न

चंद्रपुरात ‘संडे ऑन सायकल रॅली’ उत्साहात संपन्न

6

‘रोज अर्धा तास, फिटनेसचा डोस’चा दिला संदेश

पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

चंद्रपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरात ‘संडे ऑन सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दाखवली हिरवी झेंडी
या विशेष सायकल रॅलीची सुरुवात जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथून झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. या रॅलीमध्ये विविध वयोगटातील नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येत ‘अर्धा तास रोज, फिटनेस का डोज’ चा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.

आरोग्यदायी जीवनशैली आणि इंधन बचतीचा संकल्प
रॅलीदरम्यान खेळाडूं‌नी आणि नागरिकांनी पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचे महत्त्व अधोरेखित केले. नियमित सायकल चालवल्याने शारीरिक तंदूरुस्ती वाढते, तसेच इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे रक्षण होते, अशा भावना सहभागी खेळाडूंनी व्यक्त केल्या.

उपक्रमाचे चळवळीत रूपांतर व्हावे: अविनाश पुंड
“चंद्रपूर शहरात घेण्यात आलेला हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता ती आरोग्यविषयक जनजागृती करणारी चळवळ ठरावी. या माध्यमातून नागरिकांमध्ये सायकल चालवण्याची आवड वाढावी व दर रविवारी असा उपक्रम राबविला जावा,” अशी अपेक्षा जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी यावेळी व्यक्त केली.

असा होता रॅलीचा मार्ग
जिल्हा क्रीडा संकुलातून सुरू झालेली ही रॅली आंबेडकर कॉलेज, रामनगर रोड, पाण्याची टाकी, वरोरा नाका, जिल्हाधिकारी निवासस्थान या मार्गाने मार्गक्रमण करत पुन्हा बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल येथे आली. या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, संदीप उईके, विठ्ठल भालेराव, नंदू अवारे, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, मनोज पंधराम, रोशन भुजाडे, विजय डोबाले यांच्यासह क्रीडा मार्गदर्शक व कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!