महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबातील नेत्याला राष्ट्रीय पातळीवर संधी
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
मुंबई : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ ओबीसी नेते भानुदास माळी यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भानुदास माळी यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सलग ५ वर्षे अत्यंत निष्ठेने काम केले आहे. त्यांच्या या दीर्घ अनुभवाची आणि पक्षसंघटनेतील योगदानाची दखल घेऊन पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात ही मोठी जबाबदारी दिली आहे.
. भानुदास माळी यांनी यापूर्वी वरिष्ठ नेत्यांच्या साथीने महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील अत्यंत छोट्या आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले. गावपातळीपासून ते मुंबई आणि दिल्लीपर्यंत विविध सामाजिक व राजकीय आंदोलनांमध्ये त्यांनी नेहमीच अग्रभागी राहून भूमिका बजावली. ओबीसींच्या विविध प्रश्नांवर त्यांनी अनेक जनआंदोलने, भव्य मेळावे आणि प्रशिक्षण शिबिरे यशस्वीपणे आयोजित केली. तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची विशेष हातोटी असून, त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच नवा उत्साह पाहायला मिळाला आहे.
. पक्षाचे विविध कार्यक्रम यशस्वी करणे, तसेच जनता आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न पक्ष व प्रशासकीय पातळीवर अत्यंत प्रभावीपणे मांडणे या त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच त्यांची या उच्च पदावर निवड करण्यात आली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांमध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. ‘ज्यांनी महाराष्ट्रात ओबीसी काँग्रेसचे संघटन खऱ्या अर्थाने उभे केले, त्यांना आज न्याय मिळाला आहे,’ अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
. या निवडीचे वृत्त जाहीर होताच भानुदास माळी यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार मुकुल वासनिक, प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रत्यक्ष व सोशल मीडियाद्वारे अभिनंदन केले असून, पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


