Home विशेष त्रिसदस्यीय जिल्हा निवडणूक यंत्रणा सतर्क

त्रिसदस्यीय जिल्हा निवडणूक यंत्रणा सतर्क

1

विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे नोडल अधिकाऱ्यांना कडक निर्देश

तहसील व उपविभागीय कार्यालयांमध्ये होणार मतदान

चोख सीसीटीव्ही व्यवस्था आणि अचूक याद्या सादर करण्याचे आदेश

चंद्रपूर : वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजताच चंद्रपूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विषयनिहाय नोडल अधिकाऱ्यांची एक विशेष आढावा बैठक घेऊन निवडणूक पूर्व तयारीचा कसून आढावा घेतला.

.    या महत्त्वपूर्ण बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख, शुभम दांडेकर, अतुल जटाळे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर प्रत्यक्ष उपस्थित होते. तर गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष आणि वर्धाचे संजीव जाधवर यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) या बैठकीत हजेरी लावली.

जबाबदारी गांभीर्याने पार पाडा – जिल्हाधिकारी
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. त्या म्हणल्या की, “विधान परिषद निवडणूक ही अत्यंत संवेदनशील असून प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपल्याला दिलेली जबाबदारी पूर्ण गांभीर्याने पार पाडली पाहिजे. कोणत्याही स्तरावर त्रुटी खपवून घेतली जाणार नाही.”

डिजिटल पाळत आणि केंद्रांचे नियोजन
निवडणुकीच्या नियोजनानुसार वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांतील उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय येथे मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या सर्व केंद्रांवर सुरक्षेच्या आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे आणि वेब कास्टिंग (Web Casting) ची चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, निवडणुकीच्या कामासाठी लागणारे मनुष्यबळ आतापासूनच तपासून घेण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

अग्रक्रमानुसार मतदार यादी तयार करण्याचे आदेश
निवडणूक प्रक्रियेत मतदार यादी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने, प्रशासनाने ‘अचूक मतदार यादी’ तयार करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तिन्ही जिल्ह्यातील मतदारांची नावे अग्रक्रमानुसार (Alphabetical Order) व्यवस्थित लावून ही यादी त्वरित चंद्रपूर येथील मुख्य निवडणूक कार्यालयाकडे पाठवावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

error: Content is protected !!