Home सामाजिक वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी निवडणूक १८ जूनला

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी निवडणूक १८ जूनला

12

९७७ मतदार बजावणार हक्क !

तिन्ही जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन

चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची बहुप्रतिक्षित निवडणूक येत्या १८ जून २०२६ रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण ९७७ कार्यरत सदस्य आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार प्रामुख्याने उपस्थित होते. निवडणूक जाहीर झाल्याने तिन्ही जिल्ह्यांत १८ मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सर्वांनी तिचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार, जिल्हा परिषदांची संख्या ‘शून्य’
या निवडणुकीत मतदारांच्या जिल्हावार आकडेवारीचा विचार केला असता, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदारांची संख्या आहे. तिन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण ९७७ मतदार असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ४६९ मतदार, वर्धा जिल्ह्यातील २६४ मतदार तर गडचिरोली जिल्ह्यातील २४४ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या सदस्यांची संख्या सध्या शून्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या लोकप्रतिनिधींनाच मतदानाचा अधिकार मिळणार आहे.

अशी आहे सविस्तर जिल्हावार आकडेवारी
या निवडणुकीतील मतदारांच्या सविस्तर जिल्हावार आकडेवारीचा विचार केल्यास, तिन्ही जिल्ह्यांमध्ये राजकीय समीकरणे अत्यंत रंजक ठरणार आहेत. यात सर्वाधिक संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ४६९ मतदार असून, त्यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ सदस्यांचा आणि जिल्ह्यातील १० नगर परिषदा तसेच ७ नगर पंचायतींच्या एकूण ४०३ सदस्यांचा समावेश होतो. वर्धा जिल्ह्यामध्ये केवळ १० नगर परिषदांच्या एकूण २६४ सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. तर दुसरीकडे, दुर्गम व नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात ३ नगर परिषदा आणि ९ नगर पंचायतींचे एकूण २४४ सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या सविस्तर आकडेवारीमुळे कोणत्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार, हे स्पष्ट होत आहे.

१७ मतदान केंद्रांवर होणार मतदान; केंद्रीय निरीक्षकांची राहणार नजर
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकी सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदानाकरिता प्रत्येक जिल्ह्यातील उपविभागाच्या मुख्यालयी एक याप्रमाणे तिन्ही जिल्ह्यांत एकूण १७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सर्व मतपेट्या चंद्रपूर येथे आणल्या जातील आणि चंद्रपूर जिल्हा स्तरावरच मतमोजणी करून अंतिम निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली.

error: Content is protected !!