“थेंब थेंब इंधनाचा वाचवा, स्वावलंबी भारत घडवा”
मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिंह यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
ई-वाहनांना मिळणार प्रोत्साहन
चंद्रपूर : पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने “गो ग्रीन टुगेदर” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश नुकतेच देण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत ‘थेंब थेंब इंधनाचा वाचवा, स्वावलंबी भारत घडवा’ अशी सामूहिक शपथ सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
एकल वाहनांवर आर्थिक भुर्दंड; ‘हरित स्वावलंबन कोष’ स्थापन
या मोहिमेला अधिक शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने एक कडक पाऊल उचलले आहे. कार्यालयीन वेळेत जर एखादी व्यक्ती एकटीच पेट्रोल दुचाकी घेऊन आली, तर तिला प्रति दिन प्रति प्रवेश २० रुपये योगदान द्यावे लागेल. तसेच एकट्या व्यक्तीने चारचाकी वाहन आणल्यास प्रति दिन प्रति प्रवेश २०० रुपये योगदान द्यावे लागणार आहे. ही जमा होणारी रक्कम “जिल्हा परिषद चंद्रपूर हरित स्वावलंबन कोष” मध्ये जमा केली जाणार असून, तिचा वापर पर्यावरणपूरक कामांसाठी केला जाईल.
कार्यालयीन कामकाजात होणार बदल
सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार ऊर्जा बचत, संसाधन संवर्धन व पर्यावरण संरक्षण या उद्देशाने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक, कार-पूलिंग, सायकल तसेच विद्युत (इलेक्ट्रिक) वाहनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच क्षेत्रभेटी व कार्यालयीन दौरे एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला आहे. यासोबतच कार्यालयात नैसर्गिक प्रकाशाचा वापर करणे, अनावश्यक वीज व वातानुकूलित यंत्रणा (AC) टाळणे आणि बैठका शक्यतो ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ई-वाहनांना विशेष प्रोत्साहन
पर्यावरणपूरक प्रवास पद्धती स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना “हरित योगदान प्रणाली”द्वारे प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वापरावर विशेष भर दिला जाईल. जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व विभाग प्रमुख व गट विकास अधिकाऱ्यांना या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून पर्यावरणपूरक व जबाबदार प्रशासकीय कार्यसंस्कृती निर्माण करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिंह यांनी केले आहे.


