१० वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या माही, पलक आणि रुचिकाचा ‘ग्रामगीता’ देऊन गौरव
भद्रावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२६ मधील इयत्ता १० वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या भद्रावती तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. आमदार सुधाकर अडबाले यांच्या सूचनेनुसार विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भद्रावतीतर्फे या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
. या परीक्षेत तालुक्यातील विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने बाजी मारली आहे. यामध्ये माही दहेगावकर हिने ९६.२० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. तसेच पलक गोवरदीपे हिने ९५.८० टक्के आणि रुचिका जांगीड हिने ९५.६० टक्के गुण प्राप्त करून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींचा कार्यक्रमात ‘ग्रामगीता’, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विद्यार्थिनींनी आपल्या या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि स्वतःच्या कठोर परिश्रमाला दिले.
. या प्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय विधाते, तालुका अध्यक्ष संजय ब्राम्हणकर, तालुका कार्याध्यक्ष कविश्वर शेंडे, सल्लागार रमेश आसेकर तसेच प्रसिद्धी प्रमुख गणेश चिडे प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी मोलाचे मार्गदर्शन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
. या सोहळ्याला तालुक्यातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांवर सध्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


