बल्लारपुरातील १७ वर्षीय तरुणाची विसापुरात निर्घृण हत्या
गुंडांच्या टोळीच्या धुमाकूळाने नागरिकांत भीतीचे वातावरण
जुन्या वैमनस्यातून घटना घडल्याची शक्यता
बल्लारपूर : बल्लारपूर येथील गुंडांच्या एका टोळीने पाठलाग करून एका १७ वर्षीय तरुणाची खंजर आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या थरारक घटनेमुळे विसापूर आणि बल्लारपूर परिसरात प्रचंड खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शुक्रवार, १५ मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास विसापूर येथे घडली. विराज आगधारी (वय १७, रा. किल्ला वॉर्ड, बल्लारपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
भररस्त्यात थरारक पाठलाग
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर येथील पाच ते सहा गुंडांची टोळी दोन मोटारसायकलवरून सायंकाळच्या सुमारास विसापूर गावात आली. या टोळीने विराजला पाहताच विसापूरमधील तुकडोजी चौक येथून त्याचा पाठलाग सुरू केला. सुरुवातीला गुंडांनी त्याच्यावर खंजरने प्रहार केला, मात्र विराजने तो वार चुकवला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढला.
दगडाने ठेचून जागीच ठार
टोळीने विराजचा पाठलाग सोडला नाही. विसापूर रेल्वे चौकाजवळ असलेल्या अली शेख यांच्या घराच्या फाटकाजवळ गुंडांनी विराजला गाठले. तिथे त्याच्या डोक्यावर दगडाने भीषण प्रहार करून त्याला जागीच ठार केले. हत्येनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.
बहिणीचा आक्रोश आणि पोलिसांचा तपास
घटनेचे गांभीर्य ओळखून बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विपीन इंगळे आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी न्यायसहायक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक) चमूला पाचारण करून घटनेचा पंचनामा सुरू केला. विराजची बहीण घटनास्थळी पोहोचताच तिने एकच आक्रोश केला आणि संशयित मारेकऱ्यांची नावे घेतली. पोलीस सध्या फरार आरोपींचा कसून शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

