आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळणार मान्यता !
गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा
जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात होणार निर्णायक बैठक
‘डीजी लोन’सह पोलीस कल्याणासाठी आ. मुनगंटीवारांचा ऐतिहासिक पाठपुरावा
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळण्याची चिन्हे आहेत. चंद्रपूर येथे नवीन सुसज्ज पोलीस अधीक्षक (SP) कार्यालय उभारण्यासंदर्भात गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत आ. मुनगंटीवार यांनी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली आहे. या संदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथील मंत्रालयात एक विस्तृत आणि निर्णायक बैठक आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीत नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आधुनिक आणि तंत्रसुसज्ज कार्यालयाची गरज
चंद्रपूर जिल्ह्याची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारा औद्योगिक विस्तार, वाढते नागरीकरण आणि बदलत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेता, जिल्ह्यात एका आधुनिक व सर्व सुविधायुक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाची आवश्यकता गेल्या अनेक वर्षांपासून भासत होती. पोलीस अधीक्षक कार्यालय हे केवळ एक प्रशासकीय केंद्र नसून ते जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणेचे नियोजन, समन्वय, गुन्हे नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेचे मुख्य केंद्र असते. त्यामुळे या नवीन कार्यालयामुळे पोलीस प्रशासनाचे कामकाज अधिक हायटेक, गतिमान आणि प्रभावी होणार आहे.
पायाभूत सुविधा आणि पोलीस ठाण्यांचे जाळे
आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठीचे योगदान पूर्वीपासूनच उल्लेखनीय राहिले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी भद्रावती, दुर्गापूर, बल्लारपूरसह जिल्ह्यातील विविध नवीन पोलीस स्टेशनना मान्यता मिळवून दिली होती. केवळ प्रशासकीय सुधारणांवरच न थांबता, पोलीस कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या सुविधेसाठी चंद्रपूर येथील पोलीस क्वार्टर्ससाठी निधी मंजूर करून सुसज्ज निवास व्यवस्था उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, मुल येथील नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी विशेष निधी मंजूर करून आणला असून, या इमारतीचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे.
१,७६८ कोटींचे ‘डीजी लोन’; राज्यभरातून कौतुक
पोलीस दलाच्या कल्याणासाठी आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत सातत्याने आवाज उठवला आहे. नुकतेच राज्यातील ५ हजार ४५९ पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, प्रलंबित असलेल्या ‘डीजी लोन’ योजनेसाठी शासनाने तब्बल १७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. मुनगंटीवार यांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाला असून, यामुळे राज्यातील हजारो पोलीस कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेचे संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे.
. आता चंद्रपूरच्या नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रस्तावालाही गती मिळत असल्याने, चंद्रपूरच्या सुरक्षाव्यवस्थेला आणि पोलीस प्रशासनाला अधिक सक्षम करणारे आणखी एक ऐतिहासिक पाऊल पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


