कोकणातील अस्सल हापूसची थेट मेजवानी !
रसायनमुक्त देवगड-रत्नागिरी हापूस थेट शेतकऱ्यांकडून
१५ ते १७ मे दरम्यान ज्युबली हायस्कूल परिसरात आयोजन
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील आंबाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर, उमेद अभियान आणि “राणी हिराई उमेद मार्ट” यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य “आंबा महोत्सव २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन झाले असून चंद्रपूरकरांना आता थेट कोकणातील बागांमधील अस्सल हापूस आंब्यांचा आस्वाद घेता येणार आहे.
थेट शेतकऱ्यांकडून खरेदी; रसायनमुक्त आंब्यांची हमी
या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारे देवगड व रत्नागिरी हापूस आंबे सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत. हे आंबे पूर्णपणे रसायनमुक्त आणि स्वादिष्ट असून, ग्राहकांना ते थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येतील. मध्यस्थांशिवाय होणाऱ्या या विक्रीमुळे नागरिकांना दर्जेदार आंबे अतिशय वाजवी आणि परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत.
कोकणी उत्पादनांची रेलचेल
महोत्सवामध्ये केवळ हापूस आंबेच नव्हे, तर कोकणाची ओळख असलेली इतर वैविध्यपूर्ण उत्पादनेही उपलब्ध आहेत. यामध्ये कोकणचे प्रसिद्ध कोकम सरबत, आंबा पोळी आणि ताजा आमरस यांसारख्या पदार्थांचा समावेश असून ते बाजारापेक्षा कमी किमतीत विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
३ दिवस चालणार महोत्सव; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन
हा आंबा महोत्सव दिनांक १५ ते १७ मे २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहील. चंद्रपूर शहरातील ज्युबली हायस्कूल जवळील “राणी हिराई उमेद मार्ट” येथे नागरिकांना या महोत्सवाचा लाभ घेता येईल. चंद्रपूरकरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि थेट शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.


