वरोरा येथे झाडीबोली साहित्य मंडळाचा २६ वा वर्धापन दिन
पुस्तक प्रकाशन आणि कविसंमेलन उत्साहात
वरोरा : “झाडीबोलीसारख्या महाराष्ट्रातील बोली चळवळी ह्या मराठी भाषेच्या खऱ्या आधारशिला आहेत. सबंध महाराष्ट्रात उभ्या असलेल्या या चळवळींनीच मराठी भाषा जिवंत ठेवली आहे. जोपर्यंत या चळवळी जिवंत आहेत, तोपर्यंतच मराठीचे अस्तित्व टिकून राहील. ग्रामीण भागात आजही घरात आणि घराबाहेर बोलीभाषा बोलली जाते, म्हणूनच मराठी भाषा खऱ्या अर्थाने टिकली आहे. याउलट, शहरीकरणात मराठी भाषा परकीय अतिक्रमणाने गढूळ झाली आहे. तिला वाचवण्यासाठी आता लेखकांनी कसदार आणि सकस लेखन करावे,” असे आवाहन लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. पु. मा. काळभूत यांनी केले.
. झाडीबोली साहित्य मंडळ वरोरा द्वारे दि. ११ मे २०२६ रोजी कर्मवीर विद्यालय वरोराच्या सभागृहात २६ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन आणि भव्य कविसंमेलन पार पडले. हा कार्यक्रम दोन सत्रात विभागलेला होता.
प्रथम सत्र: ग्रंथ प्रकाशन आणि सत्कार सोहळा
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत आचार्य ना. गो. थुटे व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिवंगत ना. गो. थुटे यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम काळभूत होते. व्यासपीठावर झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, मराठी विभाग प्रमुख प्रा. बबन अवघडे, भद्रावतीचे गट शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, कुसुम नागो थुटे, शाखाध्यक्ष पंडित लोंढे, मदनराव ठेंगणे आणि दीपक शिव उपस्थित होते.
. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यात दिवंगत आचार्य ना. गो. थुटे लिखित ‘आयुष्याचा अभिलेख – भाग २’ या ग्रंथाचे लोकार्पण आणि शाखा सदस्यांच्या कथा-लेखांचे संपादन असलेल्या ‘अक्षरसंवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मदनराव ठेंगणे व दीपक शिव यांनी या पुस्तकांवर भाष्य केले. याच सत्रात विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे नवनिर्वाचित सदस्य इरफान शेख व अॅड. लखनसिंग कटरे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना इरफान शेख यांनी वरोरा शाखेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित लोंढे यांनी केले, तर सु. वि. साठे यांनी मधुर आवाजात ‘झाडी गौरव गीत’ सादर केले. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन शिरीष दडमल यांनी अस्खलित झाडीबोलीत केले आणि आभार सचिव चंद्रशेखर कानकाटे यांनी मानले.
द्वितीय सत्र: ४५ कवींचे बहारदार कविसंमेलन
स्नेहभोजनानंतर दुसऱ्या सत्रात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष बल्हारपूर येथील ज्येष्ठ कवी सुनील बावणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शाखेचे सल्लागार मा. तु. खिरटकर उपस्थित होते. सुरुवातीला सु. वि. साठे व सुभाष उसेवार यांनी आचार्य थुटे यांच्या स्मृतीवर आधारित रचना सादर केल्या.
. या संमेलनात जिल्ह्यातील निमंत्रित कवी आणि स्थानिक सदस्यांसह एकूण ४५ कवींनी आपल्या विविध विषयांवरील रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. समारोपप्रसंगी संमेलनाध्यक्ष सुनील बावणे यांनी आचार्य थुटे यांच्या जीवनावर आधारित ‘अध्यक्षीय गझल’ सादर केली, ज्यामुळे सभागृहात अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. या सत्राचे बहारदार सूत्रसंचालन सपना बोम्मावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झाडीबोली शाखा वरोराच्या सर्व सदस्यांनी सांघिक सहकार्य केले.


