Home चंद्रपुर जिल्हा विशेष वणी संविधान चौकात शेतकरी व वाहन चालकांना बेदम मारहाण

वणी संविधान चौकात शेतकरी व वाहन चालकांना बेदम मारहाण

14

वरोरा बैल बाजारात शुकशुकाट, व्यापाऱ्यांचा तीव्र निषेध

दोषींवर कारवाईसाठी वणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव

सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी

वरोरा : वरोरा तालुक्यातील शेतकरी आणि वाहन चालकांवर वणी येथील संविधान चौकात झालेल्या अमानवीय मारहाणीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्वतःला बजरंग दलाचे पदाधिकारी सांगणाऱ्या काही तरुणांनी शेतकऱ्यांच्या गाड्या अडवून त्यांना मारहाण केली, कागदपत्रे फाडून पैशांची मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रविवारचा बैल बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आला होता.

नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, ५ मे २०२६ रोजी सकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास वरोरा येथील शेतकरी व वाहन चालक आपल्या मालवाहतूक वाहनांमधून स्वतःची जनावरे विक्रीसाठी वणी मार्गे दुर्भा-सागळी येथील बैल बाजारात नेत होते. जनावरे नेण्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर कागदपत्रे सोबत असतानाही, वणी येथील संविधान चौक परिसरात ७ ते ८ जणांच्या टोळीने ही वाहने अडविली. आम्ही बजरंग दलाचे पदाधिकारी आहोत असे सांगून त्यांनी वाहन चालकांवर हल्ला चढवला.

मारहाण आणि लूटमारीचा आरोप
या मारहाणीत गणेश दातारकर, शंकर झाडे, शरद चटकी, राजू गुप्ता, अनिल खैरे आणि नंदकिशोर डोळस हे गंभीर जखमी झाले आहेत. संशयित आरोपींनी केवळ मारहाणच केली नाही, तर वाहनातील जनावरांची कायदेशीर कागदपत्रे फाडून टाकली आणि चालकांकडून जबरदस्तीने पैसे उकळल्याचा खळबळजनक आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वरोरा येथील व्यापारी व शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये असताना वैभव माली व विशाल दुधबळे यांनी तिथे येऊन पुन्हा त्यांना शिवीगाळ केली, तरीही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे.

वरोरा बैल बाजार बंद ठेवून निषेध
या घटनेचे पडसाद वरोरा येथे उमटले. रविवारी भरणाऱ्या बाजार समितीमधील बैल बाजारावर व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकला. जगदीश नानाजी गोचे यांच्या नेतृत्वात देवा शिवशंकर पांडे, अनिल कैलास खैरे, अजय केळसकर, रोशन देठे, अजय पिसदूरकर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय तपासणीची मागणी
पीडित शेतकऱ्यांनी वणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांना दिलेल्या निवेदनात संविधान चौक परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ५ मे रोजीचे फुटेज तपासून सत्य समोर आणावे, निवेदनात नाव असलेले संशयित आरोपी रोहन पारखी, शुभम आईकिनवार, धनराज मडावी आणि इतर साथीदारांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, जखमी वाहन चालक व शेतकऱ्यांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांचा अहवाल अधिकृतपणे नोंदवण्यात यावा. असे निवेदनातून मागण्या केल्या आहेत.

.        सुरुवातीला वणी पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी व व्यापाऱ्यांनी दिला आहे.

error: Content is protected !!