अवकाळी पावसाने नालीतील घाण मुख्य रस्त्यावर
स्वच्छतेचा बोजबारा : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रशासक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या समन्वयाचा अभाव
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील ‘आदर्श गाव’ म्हणून ओळख असलेल्या नंदोरी येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कमालीच्या निष्काळजीपणामुळे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी झालेल्या अवघ्या ३० मिनिटांच्या अवकाळी पावसाने गावातील नाल्या तुंबून घाण थेट मुख्य रस्त्यावर आली. यामुळे संपूर्ण गावात दुर्गंधी पसरली असून, प्रशासक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे ‘आदर्श’ गावाचे वास्तव आता उघड्यावर आले आहे.
अल्पशा पावसात गाव विद्रुप
नंदोरीमध्ये सध्या अतिक्रमण आणि अस्वच्छतेने कळस गाठला आहे. शुक्रवारी परिसरात केवळ अर्धा तास पाऊस झाला, मात्र नाल्यांची वेळेवर साफसफाई न केल्यामुळे त्या कचऱ्याने पूर्णपणे भरल्या होत्या. या अल्पशा पावसातच सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. नाल्यांमधील घाण घरांसमोर आणि रस्त्यांवर पसरल्याने परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
प्रशासकीय ताळमेळ मिळेना ; गाव ‘वाऱ्यावर‘
सध्या नंदोरी ग्रामपंचायतमध्ये प्रशासक राज सुरू आहे. मात्र, प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यात कुठलाही ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. या समन्वयाच्या अभावामुळे गाव विकासाच्या कामांकडे दुर्लक्ष होत असून, गाव सध्या ‘वाऱ्यावर’ असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच अवघ्या ३० मिनिटांच्या पावसाने गावचे रूप विद्रुप केले आहे. जिल्हा स्तरावर ‘आदर्श गाव’ म्हणून मिरवणाऱ्या नंदोरीचे नाव आता केवळ नावापुरतेच उरले आहे की काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
“पावसाळा तोंडावर असतानाही नाल्यांची सफाई झाली नाही, तर परिस्थिती अधिक बिकट होईल. प्रशासनाच्या या नियोजनाच्या अभावामुळे मुख्य रस्त्यावर आलेली घाण हे त्यांचे अपयश आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ पावले उचलून नाल्यांची सफाई करावी.”
. किशोर उमरे, माजी ग्रामपंचायत सदस्य, नंदोरी.


