Home सामाजिक आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध

10

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

गोंडवाना गोटूल पेनठाणा देवाळा स्थापनादिनानिमित्त गोंडी नृत्य सांस्कृतिक स्पर्धा

देवाळा येथे सुसज्ज रुग्णवाहिकेची घोषणा

२० लक्ष निधीच्या आदिवासी सभागृहाचे काम तात्काळ सुरू करण्याची दिली ग्वाही

चंद्रपूर : “देशाच्या प्रगतीमध्ये आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करून आपला झेंडा गाडला असून, आपल्यामध्ये एकलव्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे आदिवासींच्या सेवेचा किंवा विकासाचा कोणताही विषय असला, तरी मी तातडीने मदत करण्यासाठी कायम अग्रेसर असतो,” असा ठाम विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

.      भद्रावती तालुक्यातील देवाळा (मोहुर्ली) येथे ‘गोंडवाना गोटूल पेनठाणा देवाळा’च्या १० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘गोंडी नृत्य सांस्कृतिक स्पर्धा २०२६’ च्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी परिसरातील आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

दुर्गम भागातील आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिकेची भेट
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार यांनी दुर्गम भागातील समस्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “या भागातील एखादी व्यक्ती अचानक आजारी पडल्यास तिला प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत वेळेत पोहोचविणे ही मोठी समस्या असते. योग्य वेळी उपचार मिळाले तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. तसेच हा परिसर जंगलव्याप्त असल्यामुळे येथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनाही वारंवार घडतात. अशा वेळी जखमी व्यक्तीला तातडीने चंद्रपूरसारख्या मोठ्या रुग्णालयात हलविण्यासाठी सक्षम व्यवस्था आवश्यक आहे. गावात वाहतुकीची साधने मर्यादित आहेत आणि बसेस आपत्कालीन परिस्थितीत पुरेशा ठरत नाहीत. ही गरज ओळखून देवाळा गावासाठी पुढील काही दिवसांत मी सुसज्ज रुग्णवाहिका देण्याची घोषणा करीत आहे.”

पायाभूत सुविधांसह रोजगारावर भर
गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडताना आमदार म्हणाले की, रस्ते, सभागृह आणि रुग्णवाहिका अशा सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मंजूर असलेल्या २० लक्ष रुपयांच्या आदिवासी सभागृहाचे काम लवकरात लवकर सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र, केवळ पायाभूत सुविधा निर्माण करून चालणार नाही, तर आदिवासी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणेही तितकेच आवश्यक आहे. तरुणांच्या हाताला काम मिळाले आणि ते स्वावलंबी झाले, तरच खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होईल, असे त्यांनी नमूद केले.

आदिवासी कल्याणासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय
आपल्या भाषणात त्यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला, “मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असताना आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्यातील क्षमता मोठ्या व्यासपीठावर यावी, यासाठी नामांकित व दर्जेदार शाळांमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार आहे, या भावनेतून हे पाऊल उचलण्यात आले.तसेच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या बांधवांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांच्या श्रमाला योग्य न्याय मिळावा यासाठी तेंदूपत्त्याच्या बोनसामध्ये वाढ करण्यात आली. आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्रपणे ५ टक्के निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही महत्त्वपूर्ण ठरला. या निधीतून अनेक विकासकामांना गती मिळाली आणि दुर्गम भागांमध्ये मूलभूत सुविधांची उभारणी करण्यास मदत झाली.आदिवासी संस्कृती, परंपरा आणि इतिहास जपण्यासाठी ‘राणी हिराई महोत्सवा’ला शासकीय स्तरावर मान्यता मिळवून देत तो शासनाच्या माध्यमातून साजरा करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. आदिवासी समाजाचा गौरवशाली वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, हा त्यामागील उद्देश होता, असे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

जय सेवा’ हीच जगण्याची प्रेरणा
आदिवासी समाज हा निसर्गाचा पूजक असून जल, जमीन आणि जंगल यांच्याशी घट्ट जोडलेला आहे. “जय सेवा” हे केवळ घोषवाक्य नसून, समाजासाठी समर्पित जीवन जगण्याची ती प्रेरणा आहे. सेवा, संस्कार आणि समाजहित या मूल्यांवर चालत आपण सर्वांनी आदिवासी समाजाचा सन्मान आणि स्वाभिमान अधिक मजबूत करण्यासाठी एकत्रित काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

.      या कार्यक्रमाला माजी जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, आदिवासी समाजाचे नेते शुभम गेडाम, भाजप नेते रामपाल सिंह, परमेश्वर मडावी, डॉ. साची बंग, प्रभाकर कोरवते, संतोष पेन्दोर, सुनिता कातकर, बिरेंद्र सिंग ठाकूर, मनीष सिद्धू यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, आदिवासी भगिनी अनवाणी पायांनी स्वागतासाठी आल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी त्यांच्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

error: Content is protected !!