आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या मारोडा येथील ऐतिहासिक तलावाचे होणार सौंदर्यीकरण
सिंचन क्षमता वाढवण्यासाठी ‘लपा-मामा तलाव’ जोडणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकासाचा कणा असलेले ‘मामा तलाव’ (माजी मालगुजारी तलाव) आता कायापालट करणार आहेत. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील तलावांच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. मंत्रालयात पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत जिल्ह्यातील ४५ मामा तलाव व इतर तलावांच्या दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनासाठी सुमारे १५ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रालयात पार पडली महत्त्वाची बैठक
मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील तलावांची सद्यस्थिती प्रशासनासमोर मांडली. तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ, दुरुस्तीअभावी घटलेली जलसाठा क्षमता आणि यामुळे ग्रामीण भागातील शेती व पाणी उपलब्धतेवर होत असलेला गंभीर परिणाम त्यांनी निदर्शनास आणून दिला. जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी आवश्यक निधी आणि प्रशासकीय मान्यता त्वरित देण्याची आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
मारोडा तलावाचा ऐतिहासिक विकास आणि सौंदर्यीकरण
या बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांचे जन्मगाव असलेल्या ‘मारोडा’ येथील तलावाच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दा प्राधान्याने मांडला. या ऐतिहासिक तलावाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, मारोडा तलावाच्या सौंदर्यीकरणासह ‘लघु पाझर (लपा) तलाव’ हे ‘मामा तलावाशी’ जोडण्यासाठीचा (Linkage) प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सचिव जितेंद्र पापळकर यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निधीची उपलब्धता आणि प्रशासकीय कार्यवाही
जिल्ह्यातील तलावांच्या दुरुस्तीसाठी १५.७५ कोटी रुपयांच्या निधीला सहमती दर्शविण्यासोबतच, तलाव फुटीच्या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक दुरुस्ती व संरक्षणात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समिती (DPC) अंतर्गत निधी उपलब्ध करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. या सर्व कामांचा समावेश आगामी जून २०२६ च्या अधिवेशनातील “व्हाईट बुक” मध्ये करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
प्रशासकीय यंत्रणांचा सक्रिय सहभाग
बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी यांनी संबंधित तलावांची सविस्तर माहिती सादर करून आवश्यक प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवण्याची ग्वाही दिली.
. बैठकीला मंत्रालयातील अधीक्षक अभियंता प्रकाश पाटील, नागपूरचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी खटके, चंद्रपूरच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता संदीप खांबाईत आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विकासाला नवी दिशा
“जलसंधारण, शेती विकास, ग्रामीण भागातील पाणी उपलब्धता आणि पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने बैठकीत घेण्यात आलेले हे निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल,” असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.


