वाढत्या उन्हामुळे खासगी शाळांना सुटी जाहीर करण्यास पाडले भाग
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सूचनेनंतर महिला काँग्रेस आक्रमक
पालकांना मिळाला मोठा दिलासा
चंद्रपूर : जिल्ह्याचा पारा सध्या ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला असून नागरिक उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघत आहेत. अशा भीषण परिस्थितीतही जिल्ह्यातील काही खासगी शाळा शासनाचे नियम धाब्यावर बसवून सुरूच असल्याची गंभीर बाब समोर आली होती. या वाढत्या तापमानाचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी पालकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे केल्या होत्या.
. मुलांचे आरोग्य हीच प्राथमिकता असल्याचे मानून खासदारांनी तातडीने या प्रकरणी जिल्हा महिला काँग्रेसला लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, खासदार धानोरकर यांच्या मार्गदर्शनात आणि चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष कुंदा जेणेकर यांच्या नेतृत्वाखाली २ मे रोजी विशेष आंदोलन करण्यात आले.
. महिला कार्यकर्त्यांनी शहरातील विविध खासगी शाळांना भेटी देऊन शाळा व्यवस्थापनाला ‘गांधीगिरी’ मार्गाने विनंती केली. “चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळू नका आणि उन्हाळी सुट्ट्या तात्काळ जाहीर करा,” अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. महिला काँग्रेसच्या या आक्रमक पण संयमी भूमिकेचा सकारात्मक परिणाम त्वरित दिसून आला. या आंदोलनाची दखल घेत अनेक शाळा प्रशासनांनी ३ मे पासून शाळांना अधिकृत सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
. जिल्हा महिला काँग्रेसच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कुंदा जेणेकर यांनी केले. यावेळी सुनंदा धोबे, अश्विनी खोब्रागडे, अनु दहेगावकर, दीक्षा सातपुते, प्रतिभा पेंदाम, पायल दुर्गे यांसह काँग्रेसच्या अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुलांच्या हितासाठी धावून आलेल्या या महिला शक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


