Home सामाजिक कॉन्व्हेंटच्या स्पर्धेत जि.प. शाळेची भरारी

कॉन्व्हेंटच्या स्पर्धेत जि.प. शाळेची भरारी

48
नंदोरी बु. शाळेत ‘शाळा पूर्वतयारी मेळावा’ उत्साहात संपन्न!

माजी विद्यार्थी संघाकडून साहित्याचे वाटप

पहिल्याच दिवशी १९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

चंद्रपूर : शासनाच्या निर्देशानुसार, नवप्रवेशित इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये शाळेबद्दल ओढ निर्माण व्हावी, तसेच मुलांच्या पूर्वज्ञानाचा अंदाज घेऊन शिक्षकांना पुढील शैक्षणिक नियोजन करता यावे, यासाठी भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नंदोरी बु. येथे ‘शाळा पूर्वतयारी मेळावा क्र. १’ उत्साहात पार पडला. ३० एप्रिल २०२६ रोजी आयोजित या मेळाव्याला शा. व्य. स. पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती दर्शवली.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता पडताळणी आणि स्वागत
या मेळाव्यात शाळेत पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांची शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक तसेच भाषा व गणितपूर्व स्थितीचे मोजमाप करण्यात आले. पालकांनी या प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘माजी विद्यार्थी संघ, नंदोरी’ यांचा पुढाकार. शाळेप्रती असलेले आपले ऋण व्यक्त करताना, या संघातर्फे प्रत्येक प्रवेशित बालकाला लेखन साहित्य, बॅग, वॉटर बॉटल, पुरवणी पुस्तके आणि २ वह्यांचा संच मोफत वितरित करण्यात आला. या मदतीमुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दाखलपात्र ३२ पैकी १९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
शाळेच्या सर्वेक्षणांनुसार यावर्षी गावात ३२ मुले दाखलपात्र आहेत. शिक्षकांनी केलेल्या पूर्वतयारीमुळे आणि पालकांशी साधलेल्या संवादामुळे पहिल्याच दिवशी तब्बल १९ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. उर्वरित पालकांची भेट घेऊन, त्यांचा कल खाजगी कॉन्व्हेंटऐवजी जिल्हा परिषद शाळेकडे वळवण्यासाठी शिक्षक आणि शा.व्य.स. पदाधिकारी सामूहिक प्रयत्न करत आहेत.

जि.प. शाळा : जीवनातील आव्हाने पेलणारे केंद्र
“जि.प. शाळेत शिकणारा विद्यार्थी कदाचित परीक्षेतील मार्कात मागे दिसेल, परंतु तो जीवनातील हजारो आव्हाने समर्थपणे पेलणारा चतुरस्त्र नागरिक म्हणून बाहेर पडतो. महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा परीक्षांतून अधिकारी म्हणून निवड झालेले तरुण याचे जिवंत उदाहरण आहेत,” असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. पालकांनी आता हे वास्तव स्वीकारल्याने जिल्हा परिषद शाळेची पावले यशाच्या दिशेने पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

.     यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम ढवस, ‘माजी विद्यार्थी संघ, नंदोरी’ चे अध्यक्ष धनराज विरुटकर, नरेंद्र जिवतोडे, मंगेश भोयर, शरद खामनकर, रमेश झाडे, मुख्याध्यापक विजय सातपुते, विषय शिक्षक पंडित लोंढे, विजया भोमले व शिक्षक, शिक्षिका, पालकवर्ग उपस्थित होते.

.      शाळेच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून, विद्यार्थी व पालकांना पुढील शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!