१० शाळांमधील शेकडो खेळाडूंची मैदानात झुंज
मिल्खासिंग क्रीडा संकुलात ‘ग्रुप जी’ स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
क्रीडा आणि संघभावनेचा अनोखा संगम
बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विसापूर येथील सैनिक स्कूलमध्ये ‘ग्रुप जी’ गटातील आंतरगट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व संघ भावनेतून खेळल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला. या स्पर्धेत देशातील विविध भागांतील १० सैनिक शाळांमधील शेकडो फुटबॉलपटू सहभागी झाले असून, त्यांच्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याने क्रीडा रसिक भारावून गेले आहेत.
मिल्खासिंग क्रीडा संकुलावर शानदार सोहळा
विसापूर गावाच्या हद्दीतील चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर असलेल्या अद्ययावत सैनिक शाळेतील ‘मिल्खासिंग क्रीडा संकुल’ मैदानावर या स्पर्धेचा आगाज झाला. उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्राचार्य कॅप्टन अश्विन अनुपदेव, उपप्राचार्य लेफ्टनंट कर्नल रूबी दीक्षित आणि प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कमांडर रजत जी यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.
शिस्तबद्ध मार्च पास्टने वेधले लक्ष
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्कूलचा कर्णधार ऋतुराज माने याच्या नेतृत्वाखाली सर्व सहभागी संघांनी शिस्तबद्ध आणि आकर्षक ‘मार्च पास्ट’ सादर केले. सैनिकी शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या संचलनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यजमान संघाचे प्रतिनिधित्व उपकर्णधार अंश पाल याने केले.
दहा शाळांमधील चुरस
या आंतरगट स्पर्धेत महाराष्ट्रातील चंद्रपूर, सातारा, सांगली, सोलापूर यांसह बालाचडी, चपारडा, सिल्वासा आणि बिदर अशा एकूण दहा सैनिक शाळांच्या संघांचा समावेश आहे. विविध राज्यांतील हे फुटबॉलपटू आपापल्या शाळेच्या विजयासाठी मैदानात घाम गाळत असून, उत्कृष्ट ‘ड्रिबलिंग’ आणि ‘गोल’ करण्याच्या कौशल्याचे प्रदर्शन करत आहेत.
क्रीडा कौशल्याला मिळणार नवी दिशा
याप्रसंगी बोलताना प्राचार्य कॅप्टन अश्विन अनुपदेव म्हणाले की, “या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संघ भावना वाढीस लागणार आहे. खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ आहे.” सहभागी फुटबॉलपटूंनी देखील ही स्पर्धा त्यांच्यासाठी नवी दिशा देणारी ठरेल, अशी भावना व्यक्त केली.
. या स्पर्धेमुळे विसापूर परिसरात खेळाचे चैतन्य पसरले असून, आगामी काही दिवस या मैदानावर फुटबॉलचा थरार पाहायला मिळणार आहे.


