आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा संकल्प
३६६ बूथवर सूक्ष्म नियोजन
३ लाखांहून अधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आणि ‘सरल ॲप’द्वारे होणार डिजिटल नोंदणी
चंद्रपूर : देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या संवादमालिकेच्या १३० व्या भागाच्या निमित्ताने बल्लारपूर विधानसभा क्षेत्राला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याचे ध्येय आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी निश्चित केले आहे. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी ‘मिशन मोड’मध्ये काम करून प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
३६६ बूथ आणि ३ लाखांहून अधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात एकूण ३६६ बूथ असून, २०२४ च्या अधिकृत आकडेवारीनुसार येथे सुमारे ३ लाख १२ हजार ३५५ नोंदणीकृत मतदार आहेत. आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, ‘मन की बात’ हा केवळ प्रौढ मतदारांसाठीच नाही, तर १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये सकारात्मक संस्कार रुजवण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त नागरिकांना एकत्र आणून हा कार्यक्रम ऐकविण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
डिजिटल अंमलबजावणी आणि ‘सरल ॲप’चा वापर
पंतप्रधानांचा हा संवाद जनतेपर्यंत नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्र शासनाच्या ‘सरल ॲप’वर कार्यक्रमाचे फोटो आणि माहिती अपलोड करण्यासाठी एक नियोजनबद्ध तांत्रिक टीम तयार करण्यात आली आहे. बूथ स्तरावर आवश्यक फॉर्मचे वाटप करून प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाईल याची खात्री करण्यास त्यांनी सांगितले. या संपूर्ण मोहिमेचे संयोजक म्हणून ब्रिजभूषण पाझारे आणि सहसंयोजक म्हणून काशी सिंग यांची घोषणा यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी केली.
समाजपरिवर्तनाचा प्रभावी संवाद सेतू
बैठकीला संबोधित करताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, “३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेला हा उपक्रम जगातील एकमेवाद्वितीय राजकारणविरहित संवाद आहे. स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक परिवर्तन, आणि कला-संस्कृती यांसारख्या लोककल्याणाच्या विषयांवर पंतप्रधान थेट जनतेशी संवाद साधतात. भारतातील २२ अधिकृत भाषा आणि २९ बोलीभाषांमध्ये याचे भाषांतर होत असल्याने तो खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा कार्यक्रम बनला आहे.”
दांडी यात्रेचा ऐतिहासिक संदर्भ
इतिहासातील दांडी यात्रेचा दाखला देत मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे महात्मा गांधींच्या एका छोट्या कृतीतून मोठे परिवर्तन घडले, तसेच प्रत्येक कार्यकर्त्याच्या छोट्या प्रयत्नांतून बल्लारपूर पुन्हा एकदा राज्यात अव्वल ठरेल. यापूर्वी सदस्यता अभियानात बल्लारपूरने राज्यात प्रथम स्थान पटकावले होते, तोच इतिहास आता ‘मन की बात’मध्येही पुनरावृत्त करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.
. आमदार सुधीर मुनगंटीवार स्वतः २६ एप्रिल रोजी विसापूर येथील कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदवणार आहेत. या संवाद सेतू बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, संघटन प्रभारी राम लाखिया यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


