आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आ. मुनगंटीवार यांना पत्राद्वारे कळवला निर्णय
आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला उल्लेख
पुलासह रस्ते विकासामुळे परिसरातील वाहतूक सुलभ ; नागरिकांना दिलासा
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदा सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर तालुक्यातील पडोली–छोटा नागपूर भटाळी मार्गावरील प्रजिमा-४० किमी रस्त्यावर मोठ्या पुलाच्या पोचमार्गासह करण्यात येणाऱ्या बांधकामासाठी सुधारित अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली असून, या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी एकूण ₹१८,३४,०४,२७१/- इतकी तरतूद करण्यात आली आहे. आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच या प्रकल्पाला गती मिळाली आहे. या मंजुरीमुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होणार आहेत. याबद्दल नागरिकांकडून आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले जात आहे. विशेष म्हणजे, आ. मुनगंटीवार यांनी अधिवेशनात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रामध्ये उल्लेख केला आहे.
. सदर प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकात स्थापत्य विषयक कामांसाठी ₹१४,१२,५५,००५/-, वस्तू व सेवा करासाठी ₹२,३७,६४,३२२/-, मजूर विम्यासाठी ₹१४,२२,५५७/-, भाववाढ तरतुदीसाठी ₹१,४२,२४,५७३/- तसेच सेंटेज चार्जेससाठी ₹२८,२६,८१४/- इतकी रक्कम समाविष्ट करण्यात आली आहे. याआधी या कामासाठी ₹११ कोटींच्या प्रशासकीय मान्यतेनंतर आता सुधारित मान्यता देण्यात आल्याने प्रकल्पाची व्याप्ती आणि गुणवत्ता अधिक सक्षम होणार आहे.
. स्थानिक नागरिकांकडून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने मागणी करण्यात आली होती. या पुलाच्या होणाऱ्या बांधकामामुळे आणि पोचमार्गांच्या विकासामुळे परिसरातील ग्रामीण भाग शहराशी अधिक प्रभावीपणे जोडला जाणार असून, शेतीमालाची वाहतूक, दैनंदिन प्रवास आणि आपत्कालीन सेवांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.
. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या मंजुरीबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास हे माझे प्राधान्य असून, नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक प्रकल्पासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पडोली–छोटा नागपूर भटाळी मार्गावरील हा पूल आणि रस्ता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या भागाच्या विकासाला नवे बळ मिळेल.
. या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.
. यापूर्वी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि परिणामकारक पाठपुराव्याला मोठे यश मिळत नवीन चंद्रपूरच्या पायाभूत सुविधांसाठी तब्बल ₹१४४.३८ कोटींच्या भरीव निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली, तसेच मुल शहरालगतच्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलासाठी पहिल्या टप्प्यात ₹३१ कोटींची मंजुरीही प्राप्त झाली. संसदीय आयुधांचा प्रभावी वापर, अभ्यासपूर्ण मांडणी आणि ठाम नेतृत्वाच्या बळावर हे दोन्ही महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागत असतानाच आता पडोली–छोटा नागपूर भटाळी मार्गावरील मोठ्या पुलासह रस्ते विकासासाठीही ₹१८.३४ कोटींची मंजुरी मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवसंजीवनी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.


