Home सामाजिक चंद्रपूर मनपा क्षेत्रातील पट्टे वाटपासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

चंद्रपूर मनपा क्षेत्रातील पट्टे वाटपासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

6

वॉर्डांमध्ये विशेष शिबिरांचे होणार आयोजन

पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह झोन कार्यालयात अर्ज करण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रातील १ जानेवारी २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत राज्य शासनाने २३ मार्च २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांना जागेचा मालकी पट्टा देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी (दि.22) आढावा घेतला. या मोहिमेमुळे शहरातील हजारो कुटुंबांना आपल्या घराचा हक्काचा मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

.        जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी (जमीन) सचिन कुमावत, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख प्रदीप जगताप, मनपाचे उपायुक्त संदीप चिद्रावार, शुभांगी सुर्यवंशी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी स्पष्ट केले की, अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा कार्यक्रम प्रशासनाने ‘मिशन मोड’वर राबवावा. जास्तीत जास्त पात्र नागरिकांना पट्टे मिळवून देण्याच्या उद्देशाने मनपाने सकारात्मक राहून नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रशासनाचे नियोजन आणि आवाहन
या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेने व्यापक नियोजन केले आहे. नागरिकांना योजनेची माहिती देण्यासाठी आणि त्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी प्रत्येक वॉर्डांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत स्थानिक नगरसेवकांचेही सहकार्य घेतले जाईल. तसेच, शहरी भागात राबविल्या जाणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानात पट्टे वाटपाच्या विषयाला विशेष प्राधान्य देऊन तातडीने कार्यवाही केली जाईल.

.       या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मनपा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या लाभार्थ्यांकडे १ जानेवारी २०११ पूर्वीची घर टॅक्स पावती, वीज बिल किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा उपलब्ध आहे, त्यांनी तो अर्जासोबत जोडून महानगरपालिकेच्या संबंधित झोन कार्यालयात तातडीने सादर करावा.

error: Content is protected !!