Home चंद्रपुर जिल्हा विशेष जटपूरा प्रभागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था

जटपूरा प्रभागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था

12

धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त

समता विकास मंडळाने मनपा आयुक्तांना दिले निवेदन

रस्ता दुरुस्तीची आग्रही मागणी

चंद्रपूर : स्थानिक जटपूरा प्रभाग क्र. ७ आणि वार्ड नं. २ मधील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यात सापडले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक ‘समता विकास मंडळा’च्या नेतृत्वाखाली ४० ते ५० नागरिकांनी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करून तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

अमृत आणि सीवेज योजनेचा फटका
मागील अनेक महिन्यांपासून शहरात अमृत जल योजना आणि सीवेज ट्रीटमेंट पाईप लाईनचे काम सुरू आहे. या कामासाठी पंचशील चौक ते जटपूरा गेट पर्यंतचा मुख्य रस्ता खोदण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतरही हा रस्ता व्यवस्थित भरला न गेल्याने रस्ता पूर्णपणे उखडला असून त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. नवीन रस्ता बनवण्याच्या नावाखाली दोन्ही बाजूंनी एक ते दीड फूट खोदकाम करून ठेवल्याने रस्ता अरुंद झाला आहे.

धुळीच्या प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
रस्ता खराब झाल्यामुळे वाहनांच्या वर्दळीने हवेत मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. नागरिकांच्या घरात सतत धूळ जात असल्याने अस्वच्छता पसरली असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.

अपघातांच्या संख्येत वाढ
हा रस्ता शहराच्या मध्यभागी असून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा गांधी चौक किंवा कस्तुरबा गांधी मार्ग मोर्चा किंवा रॅलीसाठी बंद असतो, तेव्हा सर्व वाहतूक याच मार्गाने वळवली जाते. मात्र, सध्याच्या खड्ड्यांमुळे दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. येत्या एप्रिल-मे महिन्यात पावसाची शक्यता असल्याने, हे खड्डे अधिक धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

यांची होती उपस्थिती
समता विकास मंडळाचे अध्यक्ष नितीन रामटेके यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यावेळी पराग चुनारकर, परिमल रामटेके, नितीन रायपूरे, महेश काहिलकर, जयंत रामटेके, अमर रामटेके, सुशिल बारसिंगे, संतोष ढोले, संतोष पुणेकर, तसेच महिला प्रतिनिधींमध्ये रमा ढोले, माया अलोने, बेला रामटेके, संगिता अलोने, अस्मिता रामटेके, सुजाता रामटेके, रिता बारसिंगे, प्रणाली रामटेके, पुजा तावाडे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!