Home विशेष राज्यातील १४ हजारांवर ग्रामपंचायत निवडणूक अधांतरी

राज्यातील १४ हजारांवर ग्रामपंचायत निवडणूक अधांतरी

677

पुन्हा एकदा ग्रामपंचायत मध्ये येणार प्रशासकीय राजवट

निवडणूक आयोग व प्रशासनाची डोळेझाक कारणीभूत

अनेकेश्वर मेश्राम

   बल्लारपूर : ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत हे त्रिस्तरीय रचना ठरली आहे. मात्र मागील चार वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. आता मात्र ग्रामपंचायत निवडणूक अधांतरी लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायत मध्ये प्रशासकीय राजवट येणार आहे. याला कारणीभूत निवडणूक आयोग व प्रशासनाची डोळेझाक आहे. राज्यातील तब्बल १४ हजार २3४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक अधांतरी लटकण्याची शक्यता बळावली आहे.

.        पाच वर्षापूर्वी एप्रिल २0२0 ते डिसेंबर २०२0 मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील सुमारे १४ हजार २3४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम १५ डिसेंबर २०२0 रोजी जाहीर केला होता. या ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी २०२१ ला पार पडली होती. यातील ग्रामपंचायतीची मुदत फेब्रुवारी २०२६ मध्ये संपत आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक घेण्यासंदर्भात काहीच हालचाल नाही. परिणामी ग्रामपंचायत मध्ये प्रशासकीय राजवट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अद्याप प्रभाग रचना, प्रारूप मतदार यादी कार्यक्रम सुरु करण्यात आला नाही. केवळ सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढून प्रशासन गप्प झाले आहे.

.         आजघडीला निवडणूक आयोग व प्रशासन सर्वोच्च न्यायालयाचे आदेशान्वये राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी आटापिटा करत आहे. येथे देखील प्रशासकीय राजवट सुरु आहे. आता ग्रामपंचायत मध्ये देखील प्रशासकीय राजवट येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासासाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या त्रिस्तरीय रचनेचे केंद्रीकरण करण्याचा घाट प्रशासकीय पातळीवर केला जात असल्याचा आरोप ग्रामीण भागातील जनता करत आहे. ग्रामपंचायत मध्ये प्रभागातील आरक्षण, प्रभाग रचना व प्रारूप मतदार यादी ला किमान तीन महिन्याचा कालावधी लागेल. मात्र ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासनाची हालचाल दिसत नाही. यामुळे ग्रामपंचायत निवडणुका किमान सहा महिने पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विभागनिहाय मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या                                                                                                                      नागपूर विभाग – १५0८, अमरावती विभाग – २४४८, औरंगाबाद विभाग – ४१3४, पुणे विभाग – २८७0, नाशिक विभाग – २४७६, कोकण विभाग – ७९८, एकूण ग्रामपंचायत – १४,२3४.

विदर्भातील ४ हजारांवर ग्रामपंचायतीचा समावेश                                                                                                                              आगामी वर्षातील जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात विदर्भातील ११ जिल्ह्यातील 3 हजार ९५६ ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ६२९ ,नागपूर १30 ,वर्धा ५0, भंडारा १४८, गोंदिया १८९ व गडचिरोली जिल्ह्यातील 3६२ अशा एकूण १ हजार ५0८ नागपूर विभागातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्याच प्रमाणे अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील ५५3, अकोला २२५, यवतमाळ ९८0, वाशीम १६3 व बुलढाणा जिल्ह्यातील ५२७ अशा एकूण २ हजार ४४८ ग्रामपंचायत मध्ये प्रशासकीय राजवट अटळ असल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!