‘ऑपरेशन क्लोज गेट’
महापालिका कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद
शिस्तीच्या अंमलबजावणीमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ
चंद्रपूर : महापालिका आयुक्त अकुनुरी नरेश आज सोमवारी सकाळी दहा वाजताच्या ठोक्याला महापालिका कार्यालयात उपस्थित झाले. मात्र अधिकारी व कर्मचारी दहा वाजल्यानंतरही कार्यालयात पोहचले नाही. सर्वत्र शुकशुकाट बघून आयुक्त अकुनुरी नरेश यांनी महापालिका कार्यालयाचे मुख्य प्रवेशव्दार बंद केले. त्यामुळे उशिरा कार्यालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेशव्दाराजवळ ताटकळत उभे राहावे लागले. दरम्यान आयुक्तांनी कडक इशारा व समज देवून सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश दिला.
. नवनियुक्त आयुक्तांनी दिलेल्या या अचानक आणि कठोर दणक्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कामाच्या वेळेवर गांभीर्याने लक्ष देऊन, प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्याचा आयुक्तांचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांची कामे वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत, यासाठी आयुक्त अकुनुरी नरेश यांनी ही ‘ऑपरेशन क्लोज गेट’ मोहीम राबवली असल्याची चर्चा आहे.
. महानगरपालिकेची अधिकृत कार्यालयीन वेळ सकाळी १० वाजताची असताना, आयुक्त अकनुरी नरेश हे १० वाजता कार्यालयात दाखल झाले. मात्र, त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की, कार्यालयातील अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या जागेवर उपस्थित नव्हते. कार्यालयीन वेळेचं हे सर्रास उल्लंघन पाहून आयुक्त चांगलेच संतप्त झाले. त्यांनी लागलीच, कोणताही विलंब न करता, महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले.
. काही वेळाने, जे अधिकारी आणि कर्मचारी नेहमीप्रमाणे उशिराने कार्यालयात पोहोचले, त्यांना प्रवेशद्वारावरच मोठा धक्का बसला. महानगरपालिकेचे प्रवेशद्वार बंद पाहून त्यांची एकच धावपळ उडाली आणि बघता बघता प्रवेशद्वारासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली. शेवटी महापालिका कार्यालयाचे प्रवेशव्दारासमोर लांब रांग लागली. अधिकारी व कर्मचारी प्रवेशव्दार कुणी उघडणार या प्रतिक्षेत बाहेर उभे होते.


