Home चंद्रपुर जिल्हा विशेष पुलावरील मोठे भगदाड बुजवण्यासाठी बॅरिकेटचे तुकडे

पुलावरील मोठे भगदाड बुजवण्यासाठी बॅरिकेटचे तुकडे

439

निकृष्ट डागडुजी उघड : मनसे वाहतूक सेना आक्रमक

चंद्रपूर-नागपूर महामार्गाची दुरवस्था

रस्त्याची दुरुस्ती करा, नाहीतर टोल नाक्याला टाळे लावू’

मनसेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

​चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर महामार्गांवर निर्माण झालेल्या दुरवस्थेमुळे आणि टोल कंपनीकडून करण्यात येत असलेल्या निकृष्ट कामामुळे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टोल कंत्राटदारांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तात्काळ, मजबूत आणि कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्यास, टोल वसुली बंद करण्याची किंवा थेट टोल कंपनीला टाळे ठोकण्याची आक्रमक भूमिका मनसे वाहतूक सेनेने घेतली आहे.​

.     ​सध्या चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे उखडला असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. कंत्राटदार केवळ नाममात्र लेप लावून थातूरमातूर दुरुस्ती करत आहेत. याबाबत बोलताना, मनसे वाहतूक सेनेचे वरोरा तालुकाध्यक्ष बाळू गेडाम यांनी गंभीर आरोप केले आहेत. “कंत्राटदारांकडून खड्डे बुजविल्याचे केवळ कागदोपत्री दाखवले जात आहे. प्रत्यक्षात अत्यंत निकृष्ट दर्जाची डागडुजी केली जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

.       ​दुरुस्तीच्या नावाखाली कंत्राटदारांकडून वापरले जाणारे साहित्य किती निकृष्ट आहे, याचा अनुभव खुद्द बाळू गेडाम यांना आला. भद्रावती शहरापासून काही अंतरावर असलेल्या नाल्यावरील एका मोठ्या पुलाला भगदाड पडले आहे, जिथे सळाखी उघड्या पडल्या आहेत. ​या पुलाच्या दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क बॅरिकेटचे तुकडे तोडून तुटलेल्या जागेवर टाकले आणि खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला. बाळू गेडाम यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा करताच, संबंधित कर्मचारी डांबरासह वाहन घेऊन घटनास्थळावरून त्वरित पळून गेले. “अशा प्रकारे निकृष्ट साहित्य वापरून रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” अशी तीव्र भावना गेडाम यांनी व्यक्त केली.

.       ​सर्वात गंभीर बाब म्हणजे, भद्रावतीजवळील या नाल्यावरील मोठ्या पुलाला पडलेले भगदाड. या भगदाडामुळे पुलाची मजबुती धोक्यात आली असून, यावरून जड वाहन गेल्यास पूल खचून मोठा अपघात होण्याची आणि वाहन खाली पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महामार्गाच्या दर्जावर आणि कंत्राटदारांच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

.        ​या संपूर्ण प्रकाराची तात्काळ दखल घेऊन, नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खड्डे, भेगा आणि पुलांची मजबूत व कायमस्वरूपी दुरुस्ती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करावी, अशी मागणी मनसेने सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

.      ​“तात्काळ रस्ता दुरुस्ती करा, नाहीतर टोल वसुली बंद करा. हे दोन्ही होत नसेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे टोल कंपनीला टाळे ठोकले जाईल.” असा इशारा बाळू गेडाम यांनी प्रशासनाला आणि टोल कंपनीला दिला आहे:

.       ​या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टोल कंपनीकडून कोणती पाऊले उचलली जातात, याकडे आता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!