गडचांदूर
. शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बनावट मान्यतापत्र तयार केल्याच्या प्रकरणी दोन सहाय्यक शिक्षकांचे वेतन काढून शासनाची दिशाभूल केल्याच्या प्रकरणात कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल मुसळे व शिक्षका योगिता शेडमाके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी यांच्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयात बोगस शिक्षिकेची भरती करण्यात आल्याची तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेकडे आले. चौकशीत बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षिकेची नियुक्ती केल्याचे चौकशीत पुढे आले असून, तसा अहवाल शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. यानंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
. शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षकांची मान्यता रद्द करून वेतनाची वसुली करण्याचे आदेश शिक्षण विभागाने द्यावे अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली होती. शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी आणि बनावट मान्यता पत्र तयार करून दोन साहाय्यक शिक्षिकांचे वेतन काढून शासनाची दिशाभूल केल्याच्या प्रकरणात कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयाच्या मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी यांच्या फिर्यादीनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव तथा प्रभू रामचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक आरोपी अनिल मुसळे व शिक्षिका आरोपी योगिता शेडमाके यांचेवर भादंविच्या कलम 420, 465, 467, 468, 471 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे करीत आहे.
नोकरी मिळविण्यासाठी खोटे प्रमाणपत्र : दोघांविरोधात पोलीसात तक्रार
चंद्रपूर : महापालिका आरोग्य विभागात झालेल्या कंत्राटी पदभरतीत अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून कंत्राटी नोकरी मिळविणाऱ्या दोघांविरुद्ध महापालिकेने शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये महापालिकेची दिशाभूल करून नोकरी मिळविल्याचे नमूद करण्यात आले आहे.
. जुन महिन्यात महापालिका आरोग्य विभागातर्फे एएनएम या पदासाठी कंत्राटी तत्वावर १८ पदे भरण्यासंबंधी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. यात अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पात्र होण्यास इतर कागदपत्रांसोबतच अनुभव प्रमाणपत्र सुद्धा मागविण्यात आले होते. यात शीतल सिद्धार्थ मेश्राम यांनी सीएचएल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर यांचे तर प्रगती शंकर ढोले यांनी सिम्स हॉस्पिटल, बजाजनगर नागपूर येथे काम केले असल्याबाबत अनुभव प्रमाणपत्र सादर केले होते.
. मनपाद्वारे या कागदपत्रांची वैधता तपासण्यास या हॉस्पिटल्सला संपर्क केले असता या नावाच्या उमेदवाराने येथे काम केले नसल्याचा म्हटले, नोकरी मिळविण्यास अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून चंद्रपूर महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणूक केल्याने आरोग्य विभागामार्फत शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.