चंद्रपूरात राज्य सरकारची तिरडी यात्रा

29
  • ओबीसी समाजाचे आंदोलन तीव्र
  • राज्य सरकारचा अद्याप निर्णय नाही

चंद्रपूर

.           राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे यांनी 15 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. परंतु राज्य शासनाने या आंदोलनाची अजुनही कोणतीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या उपस्थितीत रविवारी राज्य सरकारची प्रेतयात्रा काढून संताप व्यक्त करण्यात आला.

.           सदर प्रेतयात्रा राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहीर, चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थान वर सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली. आंदोलन स्थळापासून निघालेल्या यात्रेला बस स्थानक चौकात पोलिसांनी थांबविले. यानंतर आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. त्यानंतर आंदोलकांना सोडण्यात आले.

.           या प्रतिकात्मक तिरडी आंदोलनानंतर प्रा.सुर्यकांत खनके व सतीश मालेकर यांनी मुंडन करून राज्य सरकारचा निषेध केला. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरु करण्यात यावी या मागण्यासाठी रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्याने तातडीने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर विजय बलकी व प्रेमानंद जोगी यांनी अन्नत्याग करीत उपोषण सुरु केले आहे. राज्य सरकारने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय ‌जाहीर केलेला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.