मेडिकल कॉलेजमधील घाणीचे साम्राज्य आणि डॉक्टरांच्या गायबगिरीवर खा. धानोरकरांचा संताप
प्रशासनाला दिला ८ दिवसांचा ‘अल्टिमेटम’
चंद्रपूर : जिल्ह्याचा आरोग्य कणा असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची (मेडिकल कॉलेज) विदारक अवस्था पाहून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले. “रुग्णालयाची व्यवस्था सुधारा, नाहीतर खुर्ची खाली करा,” अशा कडक शब्दांत त्यांनी अधिष्ठाता व उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गुरुवारी दुपारी त्यांनी रुग्णालयाला दिलेल्या ‘आकस्मित भेटी’ दरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
धक्कादायक वास्तव आणि अस्वच्छतेचा कळस
जिल्ह्याचे तापमान ४० अंशांच्या पार गेले असतानाही रुग्णांच्या नातेवाईकांसाठी साधे कुलर उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था असून कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी चक्क गायब असल्याचे दिसून आले. स्वच्छतेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही रुग्णालयात सगळीकडे घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली आहे. महिला प्रभागातील तुंबलेली स्वच्छतागृहे आणि फुटलेल्या नाल्यांमुळे रुग्णांचे आरोग्य सुधारण्याऐवजी अधिकच धोक्यात आले आहे.
“स्वच्छतेचा पैसा जातो कुठे ?”
यावेळी खासदारांनी जळजळीत सवाल केला की, “स्वच्छतेचा पैसा नेमका जातो कुठे ?” महिलांना मिळणारी ही वागणूक आणि आरोग्याशी होणारी तडजोड कदापि सहन केली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर प्रहार केला.
८ दिवसांचा ‘अल्टिमेटम’ आणि आंदोलनाचा इशारा
या गंभीर समस्यांची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला ८ दिवसांची मुदत दिली आहे. या काळात महिला विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करणे आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जर ८ दिवसांत बदल दिसला नाही, तर प्रशासनावर कठोर कारवाई प्रस्तावित करून स्वतः रुग्णालयात बसून ‘उग्र आंदोलन’ करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कॉंग्रेस पदाधिकारी आक्रमक
या पाहणी दौऱ्यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष लहामंगे, महिला जिल्हाध्यक्षा कुंदा जेणेकर, नगरसेवक रामनरेश यादव, अनु दहेगावकर यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले असून, गरीब रुग्णांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.


