मूळ मालकांनी कागदपत्रांसह हजर होण्याचे आवाहन
६० दिवसांच्या आत दावा न केल्यास मालकी हक्क नाकारला जाणार
वरोरा : पोलीस स्टेशन, वरोरा यांच्या कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत असलेली एकूण ५६ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या वाहनांच्या मालकी हक्काबाबत अद्याप कोणीही पोलीस स्टेशनला मूळ कागदपत्रांसह हजर झालेले नाही. त्यामुळे संबंधित वाहनधारकांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
. वरोरा पोलीस स्टेशनच्या परिसरात धूळ खात पडलेल्या या वाहनांमध्ये ५० दुचाकी, १ तीनचाकी आणि ५ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. ही सर्व ५६ वाहने पोलीस निगराणीत जमा करण्यात आली आहेत. मात्र, या वाहनांवर आजपावेतो कोणत्याही मालकाने आपला हक्क सांगितलेला नाही किंवा त्याबाबतची अधिकृत कागदपत्रे सादर केलेली नाहीत.
. या पार्श्वभूमीवर, पोलीस निरीक्षक, वरोरा यांनी जाहीर आवाहन केले आहे की, सदर वाहने ज्या कोणाच्या मालकी हक्काची असतील, त्यांनी या उद्घोषणा पत्राच्या प्रसिद्धीपासून ६० दिवसांच्या आत पोलीस निरीक्षक कार्यालयात सक्षम पुराव्यासह आपला दावा दाखल करावा. विहित कालावधी संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा दावा, हक्क किंवा तक्रार दखल घेतली जाणार नाही, याची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी.
. या मोहिमेमुळे पोलीस स्टेशनचा परिसर मोकळा होण्यास मदत होणार असून, नागरिकांनी आपल्या जप्त किंवा हरवलेल्या वाहनांची खातरजमा करण्यासाठी वरोरा पोलिसांशी संपर्क साधावा.


