‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे उद्या सागर्यात
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ उत्साहात
लोकसहभागातून राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची करणार पाहणी
वृक्षारोपणासह प्रभात फेरीचे आयोजन
भद्रावती: राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’अंतर्गत प्रसिद्ध अभिनेते आणि सेलिब्रेटी भारत गणेशपुरे मंगळवार, १० मार्च रोजी सकाळी ८ वाजता भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत सागरा येथे भेट देणार आहेत.
या दौऱ्याची सुरुवात प्रभात फेरीने होणार असून, त्यामाध्यमातून अभियानाचा प्रचार व प्रसार केला जाईल. यावेळी गणेशपुरे हे गावात लोकसहभागातून साकारलेले सार्वजनिक सभागृह, स्मशानभूमी, निराधार गृह, फळबाग आणि गोरक्षण यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करतील. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), गटविकास अधिकारी, प्रशासक आणि ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विशेष कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, डॉ. बंडुआकनुरवार, शंकर रासेकर आणि सुशील शिंदे यांनी केले आहे.


