आरक्षण सोडतीत उघड झाले वास्तव
पंचायत समितीचे सभापती रिक्त राहणार का
बल्लारपूर : तालुक्यात जिल्हा परिषदेचे विसापूर – बामणी व कोठारी – पळसगाव असे दोन गट आहे. पंचायत समितीचे विसापूर, बामणी, कोठारी व पळसगाव असे चार गण आहे. पंचायत समितीच्या गणांची सोमवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमाती महिला (एसटी) असे पूर्वीच आरक्षण काढण्यात आले. मात्र आज जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जमाती (एसटी) महिला राखीव कोणत्याही गणात नाही. यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
. बल्लारपूर पंचायत समितीच्या गणाची आरक्षण सोडत भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार रेणुका कोकाटे, नायब तहसिलदार सतीश साळवे, अजय मल्लेलवार, महेंद्र फुलझेले यांच्या मार्गदर्शनात व नागरिकांच्या उपस्थित जाहीर करण्यात आले.त्यानुसार विसापूर गण सर्वसाधारण, बामणी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), कोठारी अनुसूचित जाती (एससी) महिला व पळसगाव गण अनुसूचित जमाती (एसटी) सर्वसाधारण असे काढण्यात आले. यामुळे अनुसूचित जमाती (एसटी) महिला सभापती निवडणार असी शंका माजी सभापती ॲड. हरीश गेडाम यांनी उपस्थित केली.यावर अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली आहे, असे सांगितले.
. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील महिला सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढू शकते. त्यांना निवडून देण्याची जबाबदारी मतदारांची आहे, असा युक्तीवाद तहसिलदार रेणुका कोकाटे यांनी करून आक्षेपाचे निराकरण केले.अनुसूचित जमाती (एसटी) महिलासाठी पंचायत समितीचे गण आरक्षीत नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक आयोगाने केवळ एसटी / एससी चे आरक्षण कसे ठरविले. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक करिता पहिल्यांदाच राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना काढून अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षण काढण्याची सूचना विभागीय आयुक्त नागपूर यांना केली. त्यानुसार जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निर्देश दिले. यामुळे बल्लारपूर पंचायत समितीचे आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार बल्लारपूर पंचायत समितीचे गण कोठारी अनुसूचित जाती (एससी) महिला व पळसगाव गण अनुसूचित जमाती (एसटी) सर्वसाधारण असे आरक्षीत झाले आहे. यामुळे बल्लारपूर पंचायत समिती मध्ये सभापती पद अनुसूचित जमाती (एसटी) महिला राखीव असून या प्रवर्गात महिलासाठी आरक्षण नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.


