ताडोबाच्या वाढीव दराविरुद्ध खासदार धानोरकर आक्रमक
स्थानिकांना प्रवेश शुल्क कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
सात दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज १ ऑक्टोबरपासून जंगल सफारी पुन्हा सुरू झाली, मात्र व्यवस्थापनाने प्रवेश दर मोठ्या प्रमाणात वाढविल्याने ही सफारी सामान्य पर्यटकांसाठी महागडी ठरली आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक संतप्त झाले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भल्या पहाटेच मोहली प्रवेशद्वारावर थेट आंदोलन केले.
. यावेळी खासदार धानोरकर म्हणाल्या, “कोअर आणि बफर क्षेत्रातील सफारीसाठी प्रवेश शुल्क १,००० रुपयांनी वाढविणे चुकीचे आहे. स्थानिकांसाठी कमीतकमी प्रवेश शुल्क ठेवले जावे. अन्यथा जंगलात एकही जिप्सी जाणार नाही.” या इशाऱ्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाली.
. ताडोबाचे उपसंचालक आनंद रेड्डी यांनी खासदारांशी चर्चा करून सात दिवसांत या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, वाढीव दर कायम राहिल्यास स्थानिकांसाठी आठवड्यातून एक दिवस कोअर क्षेत्रात ३० टक्के आरक्षण देण्यात येईल. या निर्णयाने खासदार धानोरकर यांनी समाधान व्यक्त करीत आंदोलन मागे घेतले, परंतु सात दिवसात प्रत्यक्ष तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. अशी त्यांनी चेतावणी दिली.
. स्थानिक नागरिक आणि पर्यटक म्हणतात की, ताडोबाच्या पर्यटन विकासासाठी होणाऱ्या योजनेसाठी जर या रस्त्याचा उपयोग केला जात असेल, तर स्थानिकांची हितसंबंधे जपणे अत्यंत गरजेचे आहे. दरवाढीसोबतच स्थानिकांना योग्य व सुगम प्रवेश न दिल्यास पर्यावरणीय आणि सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो, असा इशारा नागरिकांनी दिला.
. या आंदोलनाद्वारे स्थानिकांना आणि पर्यटकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ताडोबा व्यवस्थापनाने सल्लागार समितीच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करून सात दिवसात तो अमलात आणण्याचे नियोजन केले आहे, असे उपसंचालक रेड्डी यांनी स्पष्ट केले.


