दुचाकीच्या अपघातातील ‘ त्या ‘ तरूणाची मृत्यूशी झुंज अखेर संपली

4

पाच दिवसाच्या जीवन संघर्षात तो हरला

विसापूर फाटा येथे झाला होता अपघात

बल्लारपूर : गझलसम्राट स्व. सुरेश भट यांनी माणसाच्या जगण्याचा संघर्ष ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.’ या ओळीत केला. याची प्रचिती ‘त्या’ तरुणाच्या अपघाती मृत्यूने विसापूर येथे आली. अपघात झाल्यावर त्याने चंद्रपूर येथील खासगी दवाखान्यात पाच दिवस जीवन संघर्षाची लढाई लढली. मात्र शनिवार (दि. २६) एप्रिल रात्री अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली. दुचाकी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अजय वासुदेव जोगी (37) रा. विसापूर ता. बल्लारपूर असे आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आईवडील, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्यू ने गाव हळहळला.

.      अजय जोगी हा मनमिळावू व होतकरू होता. तो चंद्रपूर येथे एका ठिकाणी कामाला होता. नेहमी तो दुचाकीने विसापूर ते चंद्रपूर दरम्यान प्रवास करायचा. मात्र सोमवार (दि. २१) एप्रिल रोजी रात्री ८.४५ वाजता विसापूर फाटा येथे वळण घेत असताना त्याची दुचाकी अनियंत्रित झाली. दुचाकी रस्ता दुभाजकाला जबरदस्त धडकली. यामध्ये अजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे तातडीने उपचारार्थ हलविण्यात आले.
अजयची गंभीर अवस्था झाली होती. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. तेथील उपचाराने काहीही साथ मिळाली. चार दिवसाच्या उपचाराने त्याची प्रकृती स्थिर वाटत असताना शनिवारी अधिक खालावली. पाच दिवसाच्या जीवन संघर्षात तो हरला. उपचारादरम्यान अजयची प्राणज्योत मालवली. विसापूर येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर रविवार ला अंत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.