पेन्शनर्स पगारापासून वंचित, दिवाळी सणावर सावट

33

गडचांदूर : दिवाळी सण अवघ्या आठ दिवसा वर आला आहे. परंतु पेन्शनधारकांना अजूनही आपले हक्काचे सेवा निवृत्ती वेतन अद्याप मिळालेले नाही, ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट घोंघावत आहे. पेन्शनवर अवलंबून असणारे अनेक ज्येष्ठ नागरिक सणाच्या तयारीत अडचणीत आले आहेत. सणासुदीच्या दिवसात बाजारातील महागाई आणि घरखर्च यांचा भार सावरणे त्यांच्या दृष्टीने कठीण झाले आहे. काही व्याधीग्रस्त कर्मचाऱ्यांना मासिक ऑौषधी खरच उचलणे दुरापास्त झाले आहे.

.       दर महिन्याला पेन्शन उशिराने जमा होण्याची समस्या सतत पेन्शनधारकांना भेडसावत आहे. यात पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे तर कमालीचे दुर्लक्ष होत आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेला हे निवृत्ती वेतन मिळण्याची वेळ कधीच दिसून येत नाही. हा अपवाद आता नित्याचा नियम झाला आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो आहे. शासन लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, परंतु ज्यांना खरी गरज आहे, ते वृद्ध पेन्शनधारक मात्र ताटकळत बसले आहेत. सणाच्या काळातही त्यांना पगाराच्या प्रतीक्षेत ठेवले जात आहे, हे मोठे दुर्दैव आहे.

.       “दिवाळी सणासाठी तयारी करणेही कठीण झाले आहे. पेन्शनच नाही तर दिवाळी कशी साजरी करावी ?” असे दुःख व्यक्त करत अनेक ज्येष्ठ पेन्शन धारकांनी प्रशासनाकडे तातडीने पेन्शन वितरित करण्याची विनंती केली आहे. दिवाळीपूर्वी पगाराचे वितरण व्हावे, अशी त्यांची मागणी आहे. समंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर पेन्शनचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.