कुकडहेटी ग्राम पंचायत शिपाई पदाची भरती प्रक्रिया बोगस

29

उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले चौकशीचे आदेश

सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या कुकडहेटी ग्राम पंचायत कार्यालयातील शिपाई पदाची भरती प्रक्रिया नुकतीच राबविण्यात आली. मात्र ती प्रक्रिया पूर्णतः बोगस असल्याची तक्रार खुद्द ग्राम पंचायत मधील तीन सदस्यांनी जिल्हा परिषद चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली असून सदर भरती प्रक्रियेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पंचायत समिती कार्यालयास प्राप्त झाले असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

.      ग्राम पंचायत कार्यालय कुकडहेटी येथे दोन शिपाई कार्यरत असताना एक शिपाई यांची सेवा ज्येष्ठता मध्ये पदोन्नती झाली. त्यामुळे एक शिपाई पद रिक्त झाले होते. ते रिक्त पद भरती करण्यासाठी ग्राम पंचायतीच्या १९ /२ चे मासिक सभेमध्ये ठराव घेण्यात आला. आचार संहितेचे कारण दाखवून २०/२ ते २६/२/ पर्यंत सदर पदासाठी अर्ज मागविण्यात आले. २७/२ ला अर्जाची छाननी करून २८/२ ला लेखी परीक्षा घेऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करणे, आणि २९/२/ २०२४ ला उमेदवाराला नियुक्ती पत्र देणे. असा पदभरतीचा कार्यक्रम घाईघाईत घेण्यात आला. मात्र याबाबत पंचायत समिती स्तरावर कोणतीही लेखी माहिती नाही. पद भरती बाबत अर्जाचा नमुना नाही. तसेच परीक्षेचे स्वरूप नाही. लेखी परीक्षा घेण्यासाठी ग्राम पंचायती च्या सदस्यांना प्रत्येकी ५ ते ६ प्रश्न, व ग्रामसेविका यांनी १० प्रश्न घरूनच तयार करून आणायचे असे ठरविण्यात आले.

.      मात्र काही ग्राम पंचायत सदस्यांनी यासाठी विरोध केला असता, त्यांचे कोणतेही म्हणणे न ऐकता प्रत्येक सदस्यांनी घरूनच प्रश्न तयार करून आणले. ठरल्या प्रमाणे एकूण २७ परीक्षार्थी या पदासाठी आले होते. पेपर दुपारी बारा वाजता घेण्यात आला. मात्र त्यापूर्वीच सकाळी आठ ते साडे आठ वाजताच्या दरम्यान सरपंच यांनी काही प्रश्न सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे सायंकाळी काही परीक्षार्थींनी आक्षेप घेतला. ग्राम पंचायत कडे तक्रार अर्ज दाखल केला असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

.      दिनांक २९/२/२०२४ ला नियुक्ती पत्र देण्यासाठी झालेल्या ग्राम पंचायत बैठकीत आक्षेप अर्जावर चर्चा करण्यास ग्रामसेविका पि. व्हीं. कुमरे, आणि सरपंच व काही सदस्य यांनी प्रखर विरोध करून तक्रारदार परीक्षार्थीना जे बनते, ते करा, असे धमकावत हाकलून लावले असल्याचे सुद्धा तक्रारीत म्हटले आहे. याबाबत परीक्षार्थींनी सिंदेवाहिचे गट विकास अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीला सुद्धा कचऱ्यात टाकण्यात आले असल्याचे ग्राम पंचायत सदस्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

.      त्यामुळे सदर शिपाई पद भरती प्रक्रिया ही पूर्णतः बोगस झाली असून ग्रामसेविका पी. व्ही. कुमरे, आणि सरपंच रामचंद्र श्रीरामे हेच या बोगस भरती प्रक्रियेला जबाबदार असल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद केले असल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ सदर पदभरती प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश पंचायत समिती कार्यालयास दिले असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर पद भरती प्रक्रियेत लाखो रुपयांची आर्थिक देवाण घेवाण झाली असल्याची नागरिकांत चर्चा असल्याने सदर पदभरतीचे पुढे काय होईल ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.