मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा
भद्रावती
. कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेडच्या विरोधात बरांज मोकासा येथील महिलांनी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू करून १७ दिवस लोटून सुद्धा त्यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आज २७ डिसेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा महिलांनी उपोषणस्थळी घेतला असुन पल्लवी कोरडे यांनी उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्महत्या करू असाही निर्धार महिलांनी घेतला आहे.
. बरांज मोकासा या गावातील दीडशे च्या वर महिला पुनर्वसन प्रकल्पग्रस्त महिला संघटना बरांज मोकासा या नावाने आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. उपोषण हे खान परिसरातील निर्जनस्थळी सुरू आहे. या महिला मजुरी सोडून आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकांच्या उपस्थितीत खालील ठराव घेण्यात आले. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये ही खाण बंद झाली. नंतर ती सन २०२० ला सुरू झाली. परंतु खाण बंद असताना १५ सप्टेंबर २०१६ ला करारपत्र झाले. त्यात प्रकल्पग्रस्तांना अत्यल्प मोबदला देण्याची तरतूद केली आहे. सदर करार मान्य नसल्याचे या सभेने ठरविले. तो करार रद्द करून नवीन करार करा असे सभेत ठरविण्यात आले. तसेच गावाचे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त गावापासून आठ किलोमीटर अंतरावर नागपूर – चंद्रपूर मार्गावर करणे, पुनर्वसन करताना ज्यांना प्लॉट नको त्यांना १५ लाख रुपये देण्यात यावे, नोकरी ऐवजी १५ लाख रुपये अनुदान द्यावे, नोकरी करू इच्छिणाऱ्या प्रकल्पग्रसस्तांना कर्नाटका पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीत कायमस्वरूपी नोकरी, तसेच १२६९ घरे कंपनी ने घ्यावी या प्रमुख मागणी करुन उपोषन सुरु केले आहे.