वरोरा येथे ८ डिसेंबरला विदर्भस्तरीय शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनी

36

 वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाची पत्रकार परिषदेत माहिती 

चंद्रपूर 

.          बदलत्या हवामानामुळे शेतीवर आलेले संकट, वन्यपाण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान, महावितरणचे वीजधोरण आणि यामुळे पिचला जाणारा शेतकरी यावर उपाययोजना करणे, शेतीचे व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाच्या वतीने वरोरा येथील तालुका क्रीडा संकुलात ८ डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय शेतकरी परिषद आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे, उपाध्यक्ष आबिद अली, मानद सचिव यशवंत सायरे आदींनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

.          चंद्रपूर जिल्ह्यात धान, सोयाबीन, कापूस आणि चना आदी मुख्य पिके घेतली जातात. मात्र, वातावरणातील बदल, महावितरणचे वीज धोरण आणि वन्यजिवांचा उपद्रव, शासनाचे दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात राहून शेती करतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अन्य पर्याय उभे करण्याच्या दृष्टीने या शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे जीवतोडे यांनी सांगितले. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते, परिवहन तसेच जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ. कीर्तिकुमार भांगडिया, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, आ. किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जि.प.सीईओ विवेक जॉन्सन, मानस ॲग्रोचे उपाध्यक्ष जयकुमार वर्मा, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, जैन इरिगेशनचे विदर्भ व्यवस्थापक दिलीप पांगुळ, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरूळकर यांची उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

.          परिषदेत शेतकरी हिताचे काही ठरव घेतले जाणार असून, या ठरावावर तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर विधानसभेत चर्चा व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना ठरावाची प्रत दिली जाणार आहे. शेतकरी पीक विमा, प्रोत्साहन भत्ता याकडेही परिषदेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधणार असल्याचे जीवतोडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सतीश बावणे, डॉ. नीतेश उराडे, राजेश केळझरकर, गणेश वाभिटकर, दिलीप फुलबांधे, लक्ष्मण घुगुल, भोला मडावी, बळीराम डोंगरकार, हिरालाल बघेले, बालाजी बोधाने आदी उपस्थित होते.